औरंगाबाद : जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात कमालीची शुकशुकाट जाणवत आहे. कारण, दुष्काळाचा परिणाम, जिथे दरवर्षी मार्च महिन्यात दररोज हजारो क्विंटलची आवक असते. तिथे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला नवीन गहू, ज्वारी, हरभरा तुरळक प्रमाणात विक्रीला आणला जात आहे. यामुळे आता नाईलाजाने अडत्यांनाही परराज्यातून धान्य आणून त्याची विक्री करणे भाग पडत आहे.
दुष्काळाची भयावह परिस्थिती ग्रामीण भागात जाणवत होती; पण आता शहरातही तिचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याचा अडत बाजार आहे. येथे जिल्ह्यातील शेतकरी धान्य, कडधान्य विक्रीला आणत असतात. दरवर्षी मार्च महिन्यात येथे दररोज नवीन गहू, ज्वारीची सुरुवातीला हजारपेक्षा अधिक क्विंटल आवक होत असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे आवकवर मोठा परिणाम झाला आहे. ५० ते ६० पोते नवीन गहू, ज्वारी विक्रीला येत आहे, तर १० ते १२ पोते हरभरा येत आहे. यामुळे अडत हॉलमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.
यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात मागील ३० वर्षांत गव्हाची पेरणी कमालीची घटली आहे. कारण, गव्हाला पाणी जास्त प्रमाणात लागते. सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील गव्हाचा पेरा कमी झाला आहे. येथील शेतकरी कमी पाण्यात तग धरून राहणारे ज्वारीचे पीक घेतात. मात्र, यंदा पाणीच कमी असल्याने ज्वारीची लागवडही कमी प्रमाणात झाली. ज्यांनी धाडस करून गहू, ज्वारीचे पीक घेतले पण कमी उत्पादनामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. यंदा गव्हाला पोषक अशी थंडी चांगली पडली होती; पण शेतात गहूच नसल्याने या थंडीचा फायदा झाला नाही. अडत व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले की, सध्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणलेल्या गव्हाला २१०० ते २३०० रुपये क्विंटलदरम्यान भाव मिळत आहे, तर शाळू ज्वारी २५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. कमी उत्पादनामुळे गव्हाची आवक आणखी आठवडाभर टिकेल.