औरंगाबाद : पोस्टमास्तरसह तेथील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून चुलत भावाच्या खात्यातील ४ लाख ३५ हजार ८००रुपये परस्पर काढून घेतल्याची माहिती समोर आली. ही फसवणूक ८ एप्रिल ते १९ ऑगस्ट दरम्यान जुनाबाजार येथील टपाल कार्यालयात झाली.
तक्रारदाराचा चुलतभाऊ तुषार सुभाष दरक , टपाल कर्मचारी संजित कुमार, बोलकर आणि पोस्टमास्तर कोळी अशी आरोपींची नावे आहेत. सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, सिडको टाऊन सेंटर, लोकमतनगर येथील रहिवाशी गोविंद प्रकाश दरक यांचे जुना बाजार पोस्ट ऑफिस येथे बचत खाते आहे. या खात्यात त्यांनी ४ लाख ३५ हजार ८०० रुपये ठेवले होते. काही दिवसापूर्वी त्यांचे पासबुक हरवले होते. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे त्यांना टपाल कार्यालयाकडे जाता आले नव्हते. त्यांनी डुप्लिकेट पासबुक घेतले आणि तपासले असता त्यांच्या खात्यातील रक्कम आरोपी तुषार दरक याच्या खात्यावर वळविल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी पोस्ट अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आरोपी तुषार दरक हा तक्रारदार यांचा चुलत भाऊ आहे. गोविंद यांच्या खात्यात मोठी रक्कम असल्याचे तुषारला माहित होते. त्याने बनावट बचत खाते पोस्टात उघडले आणि गोविंदांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यास सांगितले. हे करताना आरोपींनी गोविंद यांच्या बनावट सह्या केल्या. ही बाब समोर आल्यानंतर गोविंद यांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोस्टाची विश्वासार्हताच पणालापोस्ट खात्याची एक विश्वासार्हता आहे. पोस्टातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आरोपीने भावाला फसविले असले तरी त्यामुळे पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना हा एक धक्का आहे.