औरंगाबाद : शहरात निवासी भागात नियम धाब्यावर बसवून १४ गॅस एजन्सी सुरू आहेत. त्याचप्रमाणे २० पेट्रोलपंप चालकांनीही महापालिकेची एनओसी घेण्याचे औचित्य दाखविले नाही. वारंवार मनपाच्या अग्निशमन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. महापालिकेत आयुक्त नसल्याने या गंभीर मुद्यावर पुढील भूमिका निश्चित करण्यात आली नाही.
शहरात मागील काही वर्षांत निवासी वसाहतींतच गॅस एजन्सींनी आपले बस्तान मांडले आहे. आजघडीला शहरात पालिकेच्या नोंदीनुसार २२ गॅस एजन्सी आहेत. या एजन्सींना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या इमारतीत फायर यंत्रणा बसून त्याची पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून एनओसी घेणे बंधनकारक आहे. २२ पैकी १४ एजन्सींनी पालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही फायर एनओसी घेण्यास टाळाटाळ केली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून ही माहिती समोर आली.
महापालिकेने गॅस एजन्सींबरोबरच यापूर्वी शहरातील कोचिंग क्लासेस, पेट्रोलपंप, एलपीजी गॅसपंप, मोठे गोडावून, तसेच बड्या इमारतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. एनओसीसाठी संबंधित मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केले आहे. पालिकेने पोलीस प्रशासनाकडे यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा अग्निशमन विभागाने पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. मात्र, यानंतरही पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने पालिकाही आता हतबल झाली असल्याचे महापौरांच्या या बैठकीतून समोर आले. यावर आता पालिका नेमकी काय भूमिका घेते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
२० पेट्रोलपंपशहरात पेट्रोल व डिझेल पंप आणि एलपीजी गॅस एजन्सी असे मिळून एकूण ८७ पंप आहेत. ६४ पेट्रोलपंपापैकी ४६ जणांनी फायर एनओसी घेतली आहे, तर २० जणांनी पालिकेच्या नोटिसींना केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे या पेट्रोलपंपांची सुरक्षा ही सध्या रामभरोसेच असल्याचे दिसते. एलपीजी गॅस पंपांची संख्या २३ आहे. पैकी १९ पंप चालकांनी एनओसी घेतली असून, ४ जणांनी अद्यापही एनओसी घेतलेली नसल्याची माहिती महापौरांनी दिली.
आयुक्त नसल्याने अडचणकायद्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून पेट्रोलपंप, गॅस एजन्सीधारकांनी अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक आहे. २० ते २५ वर्षे जुन्या पंप, गॅस एजन्सीचालकांनी एनओसी का घेतली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महापालिकेने यापूर्वीच कारवाईचा बडगा का उगारला नाही?