लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुना मोंढ्यातील बारदान्याचे दुकान सोमवारी सकाळी आगीत भस्मसात झाले. दुकानाशेजारील कचऱ्याच्या ढिगा-यास मनपा कर्मचा-याने आग लावल्याने त्याची ठिणगी उडाल्याने ही घटना घडल्याचा आरोप दुकानमालकांनी केला.कचरा जाळू नका, असे आवाहन मनपा नागरिकांना सतत करते आहे. असे असताना मनपा कर्मचा-यांनीच जुना मोंढा येथील एका दुकानाशेजारील कचरा पेटविला. पेटविलेल्या कच-याच्या ठिणग्या शेजारच्या दुकानापर्यंत गेल्या आणि दुकानातील बारदान्यांनी पेट घेतला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे कळताच दुकानमालक शंभूलाल भानुशाली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला कॉल केला.सिडको अग्निशमन दलाचे प्रमुख शेख शकील आणि पदमपुरा अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी मोहन मुंगसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. या घटनेत संपूर्ण दुकान भस्मसात झाले.सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. महानगरपालिकेने दुकानमालकास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात आणि उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे यांनी केली.
मोंढ्यातील बारदान्याचे दुकान आगीत भस्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:29 AM