वाळूज महानगर : शॉट सर्किटने आग लागून जवळपास ६ एकरातील ऊस जळाल्याची घटना रविवारी सायंकाळी कमळापूर शिवारात घडली. आगीच्या या घटनेत ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कमळापूर शिवारात गट नंबर २१ मध्ये बाबूराव हिवाळे, कारभारी हिवाळे व सुभाष हिवाळे यांंची साडेदहा एकर जमीन आहे. पैकी ९ एकरमध्ये ऊसाची लागवड केली असून, ऊस तोडणीला आला आहे. दीड एकरमध्ये चारा लावला आहे. तिन्ही भाऊ एकत्र शेतात राहतात. कारभारी यांच्या मुलाचा विवाह असल्याने रविवारी तिघे भाऊ व नातेवाईक बस्ता बांधण्यासाठी शहरात गेले होते.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ऊसाला अचानक आग लागली. परिसरातील ग्रामस्थांनी याची ही माहिती बाबूराव हिवाळे यांना दिली. हिवाळे यांनी तात्काळ वाळूज एमआयडीसी अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती कळविली. तसेच त्यांनीही शेतात धाव घेतली. अग्निशमन बंब येईपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. अग्निशामक वाहन शेतात जात नसल्याने जवानांनी वाहन बांधावर उभे करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. हिवाळे यांनी ३ लहान टँकरच्या सहाय्याने पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत जवळपा ६ ७ एकर ऊस जळाला होता.
हिवाळे यांच्या शेतातून विद्युत तारा गेल्या आहेत. सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान तारावर पक्षी बसल्याने विद्युत तारांचे घर्षण होऊन ठिणग्या शेतात पडल्या. त्या पाचटावर पडल्याने आग लागली, असे बाबूराव हिवाळे यांनी सांगितले.