जालना : राज्यात विरोधी पक्षात असताना गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सध्या फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आता फडणवीस हे स्वत:वर खुनाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी वडीगोद्री येथे केला. चारा छावणी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा. सुप्रिया सुळे व आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आले. व्यासपीठावर आ, राजेश टोपे, माजी मंत्री फौजिया खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता सादर केली.राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार या भितीनेच भाजपा नेत्यांच्या पोटात गोळा उठल्याचे सांगून खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले नाही. गेल्या तीन महिन्यांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील व विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळाबाबत माहिती देऊन उपाययोजना आखण्याची मागणी केली होती. त्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळी भागात दौरे करुन मुख्यमंत्र्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही सरकार ढिम्मच असून, भाजपा सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. आता सरकारला जागे करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केल. जालना जिल्ह्यात भीषण परिस्थिती असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच वीजबील न भरण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. तर सर्व प्रकारच्या वसुल्या थांबविण्याची मागणी करून शेतकऱ्यांनी खंबीरपणे संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन माजी मंत्री फौजिया खान यांनी केले. आंदोलनात १० हजार कार्यकर्त्यांसह शेतकरीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जिल्हाभरात झालेल्या आंदोलनात सुमारे २५ हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. होते. अंबड तालुकाध्यक्ष मनोज मरकड, सभापती सतीश होंडे, ज्योती गावडे, उत्तम पवार, जि.प. सदस्य प्रकाश बोर्डे, संजय काळबांडे, भाऊसाहेब कणके, सरपंच बापुराव खटके, संजय कणके, अशोक गाढे, कृष्णा वैद्य, पांडुरंग मांगदरे, बाबासाहेब बोंबले उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. तसेच जालना जिल्ह्यात सरकारने दुष्काळी जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी सोमवारी येथे केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर-धुळे महामार्गावरील वडीगोद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.टोपे म्हणाले, जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्यासह महाराष्ट्रातील रोहयोची कामे सुरु करावीत, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारची वसूली थांबविली पाहिजे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. कर्जाचे पुनर्गठन होत नाही, तर दुसरीकडे पीककर्ज केवळ ५० टक्केच वाटप करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी संकटाला धैर्याने सामोरे जावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ४तीन वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यात दुष्काळीस्थिती असताना आघाडी सरकार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भागाला भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. मात्र, सध्याचे भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपाने निवडणुकीत मतदारांना स्वप्ने विकली. सत्तेत आल्यानंतर लोकांना दिलेल्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडला आहे. एलबीटीसाठी कोट्यवधी रुपये दिले जातात. मात्र, दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी या सरकारला काही मदत द्यावी, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला. यावेळी जवळपास खा. सुप्रिया सुळे, आ, राजेश टोपे, माजी मंत्री फौजिया खान यांच्या पदाधिकारी व ४ हजार कार्यकर्त्यांना गोंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनामुळे बीडकडील ३ कि़मी. पर्यंत, तर औरंगाबाद मार्गाकडील ४ कि़मी. पर्यंत वाहनांची रांग लागली होती.
मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का?
By admin | Published: September 14, 2015 11:38 PM