सिद्धेश, हृषिकेशच्या शतकाने महाराष्ट्र भक्कम स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:40 PM2018-01-03T23:40:50+5:302018-01-03T23:40:56+5:30
हृषिकेश मोटकर आणि सिद्धेश वीर यांच्या सुरेख शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पुणे येथील एमसीए स्टेडियमवर सुरूअसलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट बडोदाविरुद्ध आपली स्थिती भक्कम केली आहे.
औरंगाबाद : हृषिकेश मोटकर आणि सिद्धेश वीर यांच्या सुरेख शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पुणे येथील एमसीए स्टेडियमवर सुरूअसलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट बडोदाविरुद्ध आपली स्थिती भक्कम केली आहे. महाराष्ट्र पहिल्या डावात फक्त ४ धावांनी पिछाडीवर असून महाराष्ट्राचे सर्वच फलंदाज बाकी आहेत.
बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करताना ८५.३ षटकांत सर्वबाद ३१३ धावा केल्या. त्यांच्याकडून एन. राथवा याने ८६ चेंडूंत १५ चौकार व ३ षटकारांसह १0१ धावांची आक्रमक खेळी केली. उर्विल पटेल याने ६१ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ७0, स्मिथ ठकार याने ४८ व शिवलिक शर्मा याने ३४ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्रकडून वाय. मंगवाणी, सिद्धेश वरघंटे, ए. काळोखे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जबरदस्त फार्ममध्ये असणाºया हृषिकेश मोटकर आणि सिद्धेश वीर या जोडीने ३१३ धावांची सलामीसाठी मॅरेथॉन भागीदारी करताना महाराष्ट्राची स्थिती भक्कम केली आहे. सिद्धेश वीर ३२२ चेंडूंत १६ चौकारांसह १५0 आणि हृषिकेश मोटकर २९0 चेंडूंत २0 चौकार व एका षटकारासह १५९ धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
बडोदा (पहिला डाव) : ८५.३ षटकांत सर्वबाद ३१७.
(एन. राथवा १0१, उर्विल पटेल ७0, स्मिथ ठकार ४८, शिवलिक शर्मा ३४, वाय. मंगवाणी २/४९, सिद्धेश वरघंटे २/८0, ए. काळोखे २/३८, सिद्धेश वीर १/१८, ए. पोरे १/३0).
महाराष्ट्र (पहिला डाव) : १0२ षटकांत बिनबाद ३१३. (सिद्धेश वीर खेळत आहे १५0, हृषिकेश मोटकर खेळत आहे १५९.)