औरंगाबाद: दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील खुलताबाद येथील आठवडी बाजारात केंद्रेकर हे पत्नीसह जाऊन स्वतः बाजार करत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठवाडा विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रकर यांचा प्रशासनात दरारा आहे. कडक शिस्त आणि सर्वसामान्यांसाठी बेधडक निर्णय घेत असल्याने त्यांची दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र, या सर्वात त्यांचा साधेपणाही अनेक वेळा दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अधिकारी असतानाही कसलाही बडेजाव न करता सर्वसामान्यांसारखे बाजार करताना ते दिसून आले आहेत.
जिल्ह्यातील खुलताबाद येथे शनिवारी सकाळी पत्नीसह फेरफटका मारण्यासाठी सुनील केंद्रेकर गेले होते. यावेळी त्यांनी तेथील आठवडी बाजाराला भेट दिली. कसलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी थेट पत्नीसह बाजारात भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी बाजार केला. हे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले असून केंद्रेकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
निसर्गात, वनात आणि शेतात रमणारा अधिकारी विभागीय आयुक्त केंद्रेकर हे निसर्गात, वनात आणि शेतात रमणारे म्हणून परिचित आहेत. अधिकारी म्हंटल की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळत. याला आयुक्त केंद्रेकर हे अपवाद ठरत आहेत. यापूर्वीसुद्धा केंद्रकर गुलशन महल येथे हातात कुंदळ घेऊन काम करतान दिसले होते. तेथील वन त्यांनी स्वतः जातीने लक्ष देत फुलविले आहे.