छत्रपती संभाजीनगर : शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. हा आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता आहे. दाट नागरी वसाहतींमधून संभाव्य रस्ते दर्शविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी गायरान जमिनी बाजूला असूनही नागरिकांच्या खाजगी जमिनींवर बरीच आरक्षणे टाकली आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात सूचना-हरकती दाखल करण्यात येत आहेत.
७ मार्च रोजी मनपाच्या नगररचना विभागात प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. हरकती व सूचना मांडण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला. आराखड्यातील जुनी आरक्षणे जशास तशी ठेवण्यात आली. महापालिकेने जुन्या आराखड्यानुसार अनेक ठिकाणी टीडीआर देऊन भूसंपादन केलेले रस्ते नवीन आराखड्यातून गायब करण्यात आले. दाट लोकवस्ती, शासनाच्या घोषित स्लममधून रस्ते प्रस्तावित केले आहेत. संजयनगर (जिन्सी) भागातील दाट लोकवस्तीतून १२ मीटरचे दोन रस्ते नवीन आराखड्यात दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची झोप उडाली आहे.
प्रारूप विकास आराखड्यावर नगररचना विभागात आक्षेप स्वीकारण्यात येत आहेत. ११ मार्चपासून आक्षेप स्वीकारले जात असून, तीन दिवसांत ३०० पेक्षा अधिक आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेप नोंदविण्यासाठी संबंधित बाधित मालमत्ताधारकाचा सातबारा, आराखड्यातील नकाशाची झेरॉक्स, लाइट बिल, आधार कार्ड इ. कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे जोडून आक्षेप अर्ज दाखल करता येणार आहे. शहरातील बहुतांश भागांतील नागरिकांकडून प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेप दाखल केले जात आहे.