दिवाळीतील समाजसेवा : मित्रांनी मिळून वाटले ९०० कपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:00 PM2018-11-07T13:00:43+5:302018-11-07T13:09:22+5:30

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याची उत्सुकता असते. मात्र, गरीब कुटुंबांना पोटाची खळगी भरताना नवीन कपड्यांची खरेदी करणे शक्य होत नाही.

Social service in Diwali: Friends donates 900 clothes to poors | दिवाळीतील समाजसेवा : मित्रांनी मिळून वाटले ९०० कपडे

दिवाळीतील समाजसेवा : मित्रांनी मिळून वाटले ९०० कपडे

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

- राम शिनगारे   

औरंगाबाद : दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याची उत्सुकता असते. मात्र, गरीब कुटुंबांना पोटाची खळगी भरताना नवीन कपड्यांची खरेदी करणे शक्य होत नाही. अशा कुटुंबांना शहराच्या विविध भागात फिरून नवीन ड्रेस गोळा करून देण्याचा उपक्रम काही युवकांनी राबविला आहे. या उपक्रमात साड्या, जीन्स पॅन्ट, मुलींचे ड्रेस, लहान मुलांचे कपडे, मोठ्या माणसांचे शर्ट, कुर्ता, पायजमा आदी प्रकारचे ९०० कपडे गोळा करून वाटप केले.

शहरातील देवगिरी, विवेकानंद आणि छत्रपती महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवकांनी एकत्र येऊन वाढदिवसांऐवजी विविध सामाजिक संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबवत आहेत. निराधार निराश्रित बालकाश्रम, एड्सग्रस्त मुलांचा आश्रम याठिकाणी त्यांचे नेहमी येणे-जाणे होते. यातून मागील वर्षी दिवाळीनिमित्त घाटी, बसस्थानक आदी परिसरात दिवाळी फराळाच्या वस्तंूचे वाटप केले होते. यावर्षीच्या दिवाळीला काही तरी अभिनव सामाजिक कार्य करण्याचे ध्येय ठेवले होते. 

यंदाच्या वर्षी कपडे खरेदीचा निर्णय झाला. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील म्हाडा कॉलनी, हनुमानगनगर, जयभवानीनगर, जाधववाडी, टीव्ही सेंटर, बालाजीनगर, शिवाजीनगर आदी भागात घरोघरी जाऊन नवीन कपड्यांची मागणी केली. यास अनेक कुटुंबांनी भरभरून प्रतिसाद देत घरात असलेले नवीन कपडे दिल्याचे उपक्रमातील युवक जितेश राठी व ओंकार व्यवहारे यांनी सांगितले. दिवाळीला सुरुवात होण्यापूर्वीच जमा झालेल्या कपड्यांचे सर्व मित्रांनी एकत्र बसून शॉर्टिंग केले. मागील रविवारपासून मंगळवारपर्यंत शहरातील घाटी, मुख्य बसस्थानक, बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन आदी परिसरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना या कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात सचिन जाधव, ओंकार व्यवहारे, जितेश राठी, अनिकेत कुमावत, सिद्धार्थ जाधव, महारुद्र नन्नावरे, शशांक वायकोस, विरेन डोंगरदिवे, परमेश्वर इंगोले, शुभम तिळवणे, अक्षय तांदळे आणि प्रवीण फुन्ने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हे युवक हनुमाननगर, म्हाडा कॉलनी, चिकलठाणा आणि बेगमपुरा या परिसरातील आहेत.

इतके मिळाले कपडे
युवकांनी शहरातील विविध भागात घरोघरी फिरून साड्या १३९, जीन्स पॅन्ट १५०, मुलींचे ड्रेस ७०, लहान मुलांचे ड्रेस ३१०, शर्ट, कुर्ता व पायजमा २५५ जमा केले असल्याचे ओंकार व्यवहार याने सांगितले.

मैत्रीतून जोडले गेलो
- सामाजिक उपक्रम राबविण्याची गोडी निर्माण झाली आहे. शालेय जीवनापासून मित्र असलेले आम्ही सर्व जण एकमेकांच्या मैत्रीतून जोडले गेलो. यातूनच वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्यावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांना देण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनिमित्त कपडे वाटपाचा उपक्रम राबविला. मात्र, वर्षभर आमचा ग्रुप सतत काही ना काही करीत असतो. - जितेश राठी, विद्यार्थी, देवगिरी महाविद्यालय

- कपडे वाटप असो की, निराधार निराश्रित बालकाश्रम, बाबासाई एड्ग्रस्त मुलांचा आश्रम अशा ठिकाणी सतत भेट देण्यातून सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळत गेली. यातूनच हा उपक्रम राबविण्यात आला. - ओंकार व्यवहारे, विद्यार्थी, विवेकानंद महाविद्यालय

Web Title: Social service in Diwali: Friends donates 900 clothes to poors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.