फोन येताच महापालिकेने गुंडाळली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:02 AM2021-01-10T04:02:11+5:302021-01-10T04:02:11+5:30
औरंगाबाद : शहरात जमिनींचे भाव आकाशाला गवसणी घालत असल्यामुळे व्यावसायिक इमारतींमधील पार्किंग मागील काही वर्षांमध्ये गायब झाली आहे. या ...
औरंगाबाद : शहरात जमिनींचे भाव आकाशाला गवसणी घालत असल्यामुळे व्यावसायिक इमारतींमधील पार्किंग मागील काही वर्षांमध्ये गायब झाली आहे. या जागा मोकळ्या करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी जालना रोडसह तीन इमारतींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एका ठिकाणी राजकीय मंडळींचा फोन येताच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई गुंडाळली. अन्य एका एका इमारत मालकाला नोटीस बजावण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे व्यावसायिक इमारत विकासक, मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर असेल्या अनेक व्यावसायिक इमारतींमधील पार्किंगच्या जागा गायब झाल्या आहेत. अनेकांनी पार्किंगच्या जागांमध्ये बांधकाम करून दुकानांची विक्री केली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक इमारतींमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच शिल्लक नाही. ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. काही प्रकरणात तर भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर इमारत मालकांनी पार्किंगच्या जागांमध्ये बांधकाम केले आहे. त्यानुसार महापालिकेने पार्किंग गायब झालेल्या तब्बल ३९ इमारतींची यादी तयार केली आहे. यातील पहिली कारवाई शनिवारी नगर रचना विभाग व अतिक्रमण हटाव विभागातर्फे करण्यात आली. एसएफएस शाळेसमोर चेतन ट्रेड सेंटर या इमारतीमध्ये ४ हजार चौरस फुटांची पार्किंगची जागा गायब होती. या जागेत अतिक्रमण करून गॅरेज, प्लायवूडसह इतर दुकाने थाटण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी व्यावसायिक वापरासाठी जागेचा वापर होत होता. शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही महापालिकेने कारवाईचा श्रीगणेशा केला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास याठिकाणी नगर रचना विभागाचे सहायक संचालक जयंत खरवडकर, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासह पथक याठिकाणी पोहोचले. यावेळी अतिक्रमण हटाव विभागाचे सविता सोनवणे, पी. बी. गवळी, मजहर अली, नगररचना विभागाचे संजय कांबळे, बी. बी. बोंबले, श्रद्धा मानकर, आदींची उपस्थिती होती.
जालना रोडवर कारवाई
पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधिताला काही वेळ देण्यात आला. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने जागा मोकळी करण्यात आली. याठिकाणी जिन्याचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लक्कीसिंग सतवाल यांच्या इमारतीला पार्किंगची जागा मोकळी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. तसेच महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या सामाईक अंतरात पत्रे लावण्यात आले होते ते काढून टाकण्यात आले. अन्य एका इमारतीची पार्किंग रस्त्यावर होती. त्यामुळे संरक्षण भिंत पाडण्यात आली, असे नगररचना विभागाचे सहसंचालक जयंत खरवडकर यांनी सांगितले.
कारवाई अर्धवट नाही, २४ तासांची मुदत
राजकीय मंडळींचा किंवा आणखी कोणाचा दबाव येण्याचा प्रश्नच येत नाही. इमारत मालकाने सामान काढून घेण्यासाठी चोवीस तासांचा वेळ मागितला. आम्ही त्यांना वेळ दिली आहे. आणखी याठिकाणी कारवाई करण्यात येईल.
रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.