सोयगाव नगरपंचायत निवडणूक: थंडीच्या कडाक्यातही मतदारांचा उत्साह, सकाळच्या टप्प्यात ४३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:11 PM2022-01-18T12:11:55+5:302022-01-18T12:12:25+5:30
सकाळी साडे अकरापर्यंत एकूण १ हजार ७०८ मात्दारांपैक्की ७३५ मतदारांनी कर्तव्य बजावले आहे.
सोयगाव ( औरंगाबाद ) : जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या थंडीची लाट असतानाही सकाळपासून मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे अकरा पर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते.
सोयगावातील चार मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. निवडणूक निर्णय अशिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत यांची मतदान प्रक्रियेवर करडी नजर आहे. येथील नगरपंचायतसाठी २१ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात १३ वार्डसाठी मतदान पार पडले आहे. आज उर्वरित चार वार्डांसाठी मतदान होत आहे. चार वार्डमध्ये एकूण १२ उमेदवार उभे आहेत. सकाळपासून मतदार केंद्रावर गर्दी करत मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही मतदार बाहेर पडत आहेत.
केंद्रांवर होतंय कोरोना नियमांचे पालन
सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर मतदारांची वाढत होती. एकूण १ हजार ७०८ मात्दारांपैक्की ७३५ मतदारांनी कर्तव्य बजावले आहे. येथे सर्व प्रक्रिया कोरोना नियमांचे पालन करून पार पडत असल्याचे दिसून आले. यासाठी निवडणूक कर्मचारी, पोलिस मतदारांना सूचना देत होते.
दंगाकाबू पथक तैनात
मतदारांची वाढती संख्या पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चारही मतदान केंद्रावर अधिकची कुमुक पाठविण्यात आली आहे. दंगाकाबू पथकास तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.