पैठण रोडवर भीषण अपघात; सुसाट ट्रक वाहनांना उडवत गेला, एकाचा मृत्यू, १६ जखमी
By सुमित डोळे | Published: January 19, 2024 08:15 PM2024-01-19T20:15:09+5:302024-01-19T20:16:11+5:30
सुसाट ट्रक उतारावरून थेट ठप्प वाहतुकीत घुसला, ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पो, एका सहलीच्या बसला धडकला
- अमेय पाठक
छत्रपती संभाजीनगर : सोलापूर- धुळे महामार्गावरून बीडच्या दिशेने शहरात आलेला सुसाट ट्रक वाल्मी चौकात थेट ठप्प झालेल्या वाहतुकीत घुसला. वाहनांना आडवे उभे उडवत गेला. वाहने उभीच असल्याने ट्रकच्या धडकेत जवळपास १३ वाहनांचा चुराडा झाला. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू होऊन अक्षरशः डोक्याचा भुगा झाला, तसेच ४ गंभीर, तर १२ वाहनचालक किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता झालेल्या भीषण अपघाताने सगळेच हादरून गेले.
सध्या पैठण रस्त्याचे काम सुरू आहे. शिवाय, सोलापूर- धुळे महामार्गाची शहरातील मार्गाची खालील बाजू गेल्या अनेक दिवसांपासून मातीचा ढिगारा लावून बंद करण्यात आली आहे. परिणामी, वाल्मी चौकात पुलाखाली रोज सायंकाळी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. शुक्रवारीदेखील सायंकाळी ६ वाजेपासून वाहतूक ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटे अनेक चालक वाहने बंद करून उभी होती. साडेसात वाजेच्या सुमारास बीडच्या दिशेने आलेला ट्रक महामार्गावरील पूल उतरला व वाल्मी चौकाच्या दिशेने खाली उतरला. उतारावर मात्र त्याच सुसाट वेगात उतरून ट्रकने सुरुवातीला एका इनोव्हाला उडवले. त्यानंतर तो थेट समोर ठप्प झालेल्या वाहतुकीत घुसला. वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत असलेल्या वाहनांना ट्रक थेट चिरडत गेला.
...अन् सहलीच्या विद्यार्थ्यांचा बालंबाल जीव वाचला
ट्रकचा वेग इतका भीषण होता की, त्याने ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पोंचा चुराडा केला. याच गर्दीत अडकलेली सहलीच्या विद्यार्थ्यांची बस मात्र बालंबाल वाचली. त्यात जवळपास ५२ पेक्षा अधिक विद्यार्थी होते. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. मात्र, सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. साताऱ्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, देवीदास शेवाळे, वाहतूकचे सहायक निरीक्षक सचिन मिर्धे यांनी धाव घेतली.
मृत्यू आणि जखमी
या अपघातात मूळ धाराशिव च्या मनीषा पद्माकर सिंगनापूरे (४५, रा. चितेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर शफिक शेख (रा. संजयनगर), इरफान शेख (रा. छावणी), अब्दुल बासिद (रा. वडगाव), रहीम खान पठाण (संजयनगर), माया बोर्डे, पिंटू बोर्डे (दोघे रा. प्रियदर्शनी), इंदिरा मगर, भगवान गव्हाणे (रा. जवाहर कॉलनी), मयूर लावरे (रा. पैठण गेट), हृषिकेश चांगुलपाय (रा. नक्षत्रवाडी), सायली दानवे, चंद्रकांत डांगरे, सायली डांगरे हे जखमी झाले. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.
अंबाबाईची कृपा, माझे कुटुंब एका इंचाच्या अंतराने वाचले
गेवराई तांड्याचे रहिवासी रणजित राठोड यांनी अपघात प्रत्यक्ष पाहिला. या भीषण अपघाताचे वर्णन करताना अंग थरथरत होते तर डोळ्यांत पाण्याच्या धारा वाहत होत्या. मी इनोव्हा ( एम एच २० डिजे ३९४६) कार ने आई, पत्नी, मुलांना घेऊन तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सायंकाळी शहरात आलो. तांड्याकडे जाण्यासाठी वाल्मी नाक्यावर वळण घेतले व मोठी वाहतूक जॅम झाली होती. १५-२० मिनिटे एकाच ठिकाणी गाड्या थांबून होत्या. आईसोबत माझ्या गप्पा सुरू असतानाच मोठा आवाज आला आणि माझ्या गाडीला धक्का लागला. काय झालंय, कळायच्या आत सुसाट ट्रक वाहने चिरडून जात होता. पत्नी, आई किरकोळ जखमी झाल्या. एक इंच जरी अलीकडे असतो तर माझं कुटुंब संपलं असतं. ‘आई अंबाबाई’ची कृपेने माझे कुटुंब वाचले.