सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा संकुलात तालुकापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा होतात, मात्र बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना येथे कसल्याच सोयी-सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे़ हे कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशाच स्थितीत असल्याचे दिसून येत आहे़जिल्हा कार्यालय सुसज्ज व स्वच्छ असावे़ मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालय याला अपवाद आहे़ या क्रीडा कार्यालयाच्या परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य तर पसरलेलेच आहे, शिवाय येथे येणाऱ्या खेळाडूंना योग्य त्या सोयी-सुविधाही मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे़खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना राहण्यासाठी क्रीडा कार्यालयात तीन मजली इमारत आहे़ यामध्ये पहिल्या मजल्यात कार्यालय आहे तर दुसऱ्या व तीसऱ्या मजल्यावरील १२ हॉलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते़ मात्र प्रत्यक्षात या खेळाडूंना राहण्यासाठी ना योग्य रूम आहेत, ना लाईट़ स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली असून त्यांना इतर सोयी सुविधाही मिळत नसल्याने येणाऱ्या खेळाडूंमधून नाराजीचा सुर उगवत आहे़विशेष म्हणजे या कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता, याची चौकशीही झाली होती, आणि यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या़ मात्र कसलीच कारवाई त्यांच्यावर झालेली नाही़ अशा या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच खेळाडूंना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे़ या कार्यालयात तीन क्रीडा अधिकारी आहेत, मात्र तीनपैकी एक क्रीडा अधिकारी केवळ दोनच दिवस काम करून पसार झाला तर दुसऱ्या क्रीडा अधिकारी आजारी रजेवर गेलेल्या आहेत, त्यामुळे या कार्यालयाचे नियोजन पुर्णत: ढासळले आहे़ याचा त्रास खेळाडूंना सहन करावा लागत आहे़राज्यस्तरीय स्पर्धा असतील तर त्यामध्ये सहा विभाग येतात, आणि या सहा विभागातील खेळाडुंसाठी सहा हॉल असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले़ मात्र या खेळाडूंना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर सुविधा दिल्या जातात का? असे विचारले असता, त्यांना उत्तर देता आले नाही़याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसुळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी नॉटरिचेबल होता़
क्रीडा कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’!
By admin | Published: January 14, 2015 12:22 AM