औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्ताचे सोने करीत औरंगाबादकरांनी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दागिने, वाहन खरेदी केली. दिवसभर खरेदीला उधाण आले होते. दसऱ्याच्यानिमित्ताने कोट्यवधींची उलाढाल बाजारात झाली. बाजारपेठेत वर्षभर उलाढाल होत असते; पण दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी करणे हे आजही शुभ मानले जाते. यामुळे दसऱ्याचा खरेदीचा उत्साह औरच असतो. ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक, कंपन्याही विविध सूट, सवलती देत असतात. याचाही फायदा उचलत शहरवासीयांनी जोमात खरेदी केली. सकाळच्या वेळी बाजारात विविध शोरूममध्ये गर्दी दिसून आली. मात्र, दुपारच्या वेळेस गर्दी ओसरली होती पण सायंकाळी पुन्हा एकदा गर्दीला उधाण आले. एकीकडे ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या, तर दुसरीकडे नवीन वस्तू खरेदीसाठी शोरूमवर गर्दी उसळली होती. मोबाईल बाजारात सर्वाधिक उलाढाल दिसून आली. सिडकोतील कॅनॉट प्लेस परिसर, पैठणगेट, निरालाबाजार आदी भागात मोबाईल हँडसेट खरेदी केले जात होते. यातही ४ जी मोबाईल खरेदीला प्राधान्य दिले जात होते. वाहन बाजारातही उत्साह दिसून आला. पैठणगेट ते टिळकपथ या रोडवर नवीन कपडे खरेदीसाठीही ग्राहकांची झुंबड उडाली होती. बाजारात आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या दसऱ्याच्या मुहूर्ताने बाजारपेठेतील मंदी हटली असून दिवाळीपर्यंत खरेदीचे उधाण वाढतच राहील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दुचाकी बाजारातही धूम दुचाकी बाजारातही धूम दिसून आली. सर्व नामांकित कंपन्यांच्या मिळून शहरात सुमारे २ हजार दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज वितरक हेमंत खिवंसरा यांनी व्यक्त केला. यातही ४० हजार ते ६० हजार रुपये दरम्यांच्या ८० टक्के दुचाकी विक्री झाल्या. उर्वरित २० टक्के दुचाकीमध्ये ६५ हजार ते दीड लाखांपर्यंतच्या दुचाकी विक्री झाल्या. ४०० पेक्षा अधिक चारचाकी रस्त्यांवर शहरात सर्व कंपन्यांच्या मिळून दिवसभरात ४०० पेक्षा अधिक नवीन कार विक्री झाल्या असल्याची माहिती कारचे वितरक राहुल पगारिया यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यात १० लाख रुपयांखालील ८० टक्के कार विक्री झाल्या, तर ११ लाखांपुढील २० टक्के कार विकल्या गेल्या. मागील वर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत यंदाचा दसरा समाधानकारक राहिला. दिवाळीला कारची विक्री २० टक्क्यांनी वाढेल, असा होराही त्यांनी व्यक्त केला. आरटीओला दसरा फलदायीदसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची प्रथा औरंगाबादकरांनी यंदाही कायम राखली. त्यामुळे वाहन नोंदणी शुल्क, टॅक्स आणि चॉईस नंबर यातून आरटीओ कार्यालयास मंगळवारी एका दिवसात ३२ लाखांचा महसूल प्राप्त झाला. आरटीओ कार्यालयास दसरा चांगलाच फलदायी ठरला. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. दसरा आणि वाहन खरेदी हे जणू समीकरणच बनले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला मंगळवारी वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांच्या सुविधेसाठी आरटीओ कार्यालय मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले. दुपारपर्यंत कार्यालयात ४२१ दुचाकी आणि ११ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. नोंदणी शुल्क व चॉईस नंबरपोटी ३५ हजार ३१० रुपये तर टॅक्सपोटी तब्बल ३१ लाख ६६ हजार ८३६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीला उधाण
By admin | Published: October 12, 2016 12:55 AM