छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्या लागताच सणासाठी गावी जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. रेल्वे स्टेशन, सिडको, मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. रेल्वे, बसेस येत नाही तोच अवघ्या काही वेळेत त्या भरूनही जात आहेत. रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने अनेकजण विनातिकीट प्रवासाचे धाडस करीत आहेत; मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अशांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
नाशिक, अकोला, जळगाव, धुळे, अमरावतीसह विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिक्षणानिमित्त, अनेक नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात राहतात. दिवाळी सणासाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांत गर्दी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक गुरुवारी प्रवाशांनी भरून गेले होते. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येत आहेत; परंतु अनेक मार्गांसाठी बसेस वेळवर येत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागत होते. हीच स्थिती रविवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
परभणी, नांदेड, मुंबई, नाशिक, हैदराबाद, आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. ‘दमरे’कडून १० आणि १७ नोव्हेंबर रोजी नांदेड-पनवेल येथे विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. आजघडीला बहुतांश रेल्वेंचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे वेटिंगवरच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.
रेल्वेच्या ३६ तिकिट निरीक्षकांकडून तपासणी‘दमरे’च्या नांदेड विभागाच्या डीआरएम नीती सरकार यांच्या देखरेखीखाली बुधवारी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान रेल्वेस्टेशनवर १८ रेल्वे तपासण्यात आल्या. मोहिमेत वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद यांच्यासह ३६ तिकीट निरीक्षक, ५ आरपीएफ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मोहिमेत ६०८ विनातिकीट प्रवासी, १११ अनियमित तिकीट प्रवासी आणि १६ अनबुक्ड लगेज अशा एकूण ७३५ जणांवर कारवाई करून ४ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.