'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:25 PM2022-06-24T20:25:57+5:302022-06-24T20:26:34+5:30
रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला.
औरंगाबाद : बहुमजली इमारत तयार झाली. मात्र, इमारतीवर जाण्यासाठी पायऱ्या अथवा उद्वाहन (लिफ्ट) नाही, अशी नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था असल्याचे गुरुवारी सुनावणी दरम्यान रेल्वेतर्फे सादर करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या छायाचित्रांवरून निदर्शनास आले.
रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. मात्र, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपूल आणि शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाची सद्यस्थिती, झालेले आणि राहिलेले काम, पूर्णत्वासाठीचा प्रस्तावित अवधी आदी तांत्रिक बाबी सविस्तरपणे न्यायालयात मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी हजर राहण्याची अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. पानसरे यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
ॲड. नावंदर यांनी खंडपीठात निवेदन केले की, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाला जोडणारे अहमदनगर ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे (ॲप्रोच रोड) सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणारे काम पूर्ण झाल्यास हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकेल. अहमदनगरकडील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून औरंगाबादकडील रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी पुलासाठी भूसंपादन चालू असून त्याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे. ज्यांची जमीन या कामासाठी संपादित केली जाणार आहे, त्यांची माहिती महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास भूसंपादनाचे काम जलदगतीने होईल, असे सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी निवेदन केले. त्यावर तशा सूचना विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी निवेदन केले. महापालिकेने येथील कामाचे ४ कोटी रुपये दिले असल्याचे ते म्हणाले. सुनावणीस याचिकाकर्ता ॲड. रुपेश जैस्वाल, रस्ते महामंडळातर्फे ॲड. एस. व्ही. अदवंत आदी उपस्थित होते.