औरंगाबाद :‘कदम कदम बढाये जा....’ यानुसार दररोज अगदी न चुकता काही जणांचा मॉर्निंग वॉक कोरोना, लॉकडाऊन यांना न जुमानता सुरू आहे. मॉर्निंग वॉक आणि त्याच्या जोडीला मित्रमंडळींसोबतच्या भेटी-गाठी, गप्पा-टप्पा असे प्रकारही जोरात सुरू आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही मंडळींचे हे बिनधास्त वागणे पाहून मॉर्निंग वॉक कशासाठी, आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी, असा प्रश्न पडतो.
साधारणपणे सकाळी साडेपाच ते ८ या वेळेत शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गर्दी, लगबग दिसून येते. काही जण एकेकटे असतात, तर काही जण घोळक्याने बाहेर पडलेले दिसून येतात. यामध्ये ४० ते ५५ या वयाेगटातील नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे दिसून येते.
यापैकी काही जण सायंकाळी आणि रात्रीही घराबाहेर पडतात. आरोग्यासाठी फिरणे योग्य असले तरी सध्याच्या काळात आपल्या घरात राहून जो काही व्यायाम करता येईल तो करा, कमी जागा असली तरी अंगणात आणि गच्चीवरच फिरा, मॉर्निंग वॉक टाळा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
चौकट :
पोलिसांकडूनही सूट
- एप्रिल महिन्यात जेव्हा कोरोनाचा कहर सुरू होता तेव्हाही औरंगाबादकर बिनधास्तपणे सकाळी आणि सायंकाळी फिरायला घराबाहेर पडत होते. लॉकडाऊन लागू आहे, हा विचारही त्यांच्या मनात नसायचा.
- शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर शतपावली करायला म्हणून नागरिक घराबाहेर पडत आहेत. यावेळी नागरिकांसोबत त्यांची मुले, घरातले एखादे पाळीव कुत्रे किंवा मांजरदेखील सोबत असते.
- सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलीसही क्वचितच हटकताना दिसतात. यावेळी बऱ्याच नागरिकांनी मास्क लावलेलाही नसतो.
चौकट :
खुली हवा नव्हे, कोरोनाचे विषाणू
हवेतून कोरोना पसरतो की नाही, याबाबत संभ्रम असला तरी अशा वातावरणात सकाळ - संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणे जोखमीचे आहे. यातही अनेक जण फिरताना त्यांचा मास्क हनुवटीच्या खाली करून फिरतात किंवा मग मास्क लावतच नाहीत. आपल्या बाजूने जाणारा एखादा शिंकला किंवा खोकलला तरी त्यातूनही संसर्ग होण्याचा धोका टाळता येत नाही. अनेक जण तीन- चारच्या ग्रुपने फिरताना दिसतात. फिरताना एकमेकांना टाळी देणे, खांद्यावर हात टाकणे, असे प्रकारही दिसून येतात. तसेच मॉर्निंग वॉक झाला की घरी जाताना दुकानातून दूध, बिस्किटे, भाज्या किंवा तत्सम वस्तू सॅनिटाईज न करता घरी घेऊन येणे, असे प्रकारही होत आहेत. त्यामुळे आपण घराबाहेर खुली हवा घेण्यासाठी जात आहोत की कोरोनाचे विषाणू आणण्यासाठी, हे देखील एकदा तपासून पहावे.
चौकट :
प्रतिक्रिया
कोरोनाची भीती वाटत नाही का?
- कोरोनाची भीती वाटते, पण गुडघ्याचे दुखणे असल्याने फिरण्याशिवाय पर्याय नाही. चाललो नाही, तर गुडघे साथ देत नाहीत. अंगण आणि गच्चीवर चालल्याने समाधान होत नाही, त्यामुळे घराबाहेर पडतो, असे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
- मागील अनेक वर्षांपासून आम्ही न चुकता मॉर्निंग वॉक करतो. चालताना शक्यतो कुणी आमच्या अगदी बाजूने जाणार नाही, याची काळजी घेताे. स्वत:ची आणि इतरांचीही थोडी काळजी घेतली तर मॉर्निंग वॉक करणे धोकादायक वाटत नाही, असे काही नागरिकांचे मत आहे.