वाळूज महानगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या मुख्य नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाला एमआयडीसी प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली आहे. बजाजनगरातील नाल्यालगत राहणाºया नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय या संरक्षक भिंतीमुळे दूर होणार आहे.
वडगाव कोल्हाटी पोलीस आयुक्तालय मैदानाकडून येणारा मुख्य नाला बजाजनगरातील अयोध्यानगर, महावीर चौकातून पंढरपूरमार्र्गे खाम नदीला मिळतो. ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाणारा हा बजाजनगरातील मुख्य नाला आहे. नाल्याची वेळेवर साफसफाई व देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने नाल्यात गाळ साचला आहे. गाजर गवत व झुडपे वाढल्याने अडचण निर्माण झाली आहे. नाल्याची भिंत जीर्ण झाल्यामुळे मोडकळीस आली असून, अनेक ठिकाणी तुटली आहे. नाल्यात वास्तव्य करणाºया सरपटणाºया प्राण्यांचा नागरी वसाहतीत वावर वाढला आहे.
रहिवाशांनी अनेक वेळा एमआयडीसीकडे नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली. अखेर एमआयडीसीने नाला संरक्षक भिंतीचे काम नुकतेच हाती घेतले. एमआयडीसीने दोन खाजगी ठेकेदाराला अयोध्यानगर ते महावीर चौक व स्मशानभूमी ते सीतानगर, असे तोडून काम दिले आहे. अयोध्यानगरापासून नाला संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अयोध्यानगर ते महावीर चौक साधारणत: एक ते दीड किलोमीटर नाल्याच्या दोन्ही बाजूने आरसीसी संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. जेसीबीच्या साह्याने नाल्यातील गाळ बाहेर काढून साफसफाई करून भिंतीचे काम केले जात आहे.