औरंगाबाद : मनपा निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकलाच पाहिजे. यासाठी जिद्दीने कामाला लागा व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले.
नूतनीकरण केल्यानंतर गांधी भवनात झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते. मनपा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी हात वर करावा, असे सुचवत व वर केलेले हात मोजत ‘इथेच २०-३०’ जण इच्छुक दिसत आहेत’ अशी टिपणी त्यांनी केली. देशात आणि महाराष्ट्रात येणारा काळ हा काँग्रेसचा राहणार असून, मतदार यापुढे भाजपला संधी देतील, असे वाटत नसल्याचे नमूद करीत देशमुख यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी या देशात चांगले काम करू इच्छित आहेत, त्यांचे हात मजबूत करणे हे काँग्रेसचे कर्तव्य होय, अशी साद घातली. याचवेळी वेगवेगळ्या पक्ष संघटनांतील काही कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. हा धागा पकडून लातूरमधील एक किस्सा त्यांनी सांगितला व औरंगाबादमध्ये काँग्रेसमधून अमुक-अमुक यांचा प्रवेश, असे होणार नाही, असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. यात सहभाग सहभागी होण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.
पक्षनिरीक्षक खान व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. गुलाब पटेल यांनी आभार मानले. आ. राजेश राठोड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, संजय लाखे पाटील, विलास औताडे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, अहमद चाऊस, डॉ. जितेंद्र देहाडे, शहर महिला अध्यक्ष सरोज मसलगे पाटील, जिल्हाध्यक्षा सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.