औरंगाबाद : तामिळनाडू राज्यातील स्टरलाईट प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द होऊ शकतो. तर मग लोकांचा विरोध असताना कोकणातील नाणार प्रकल्प रद्द का होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी नाणार परिसरातील गावांतील लोकांशी चर्चा करावी. त्यांचा विरोध कायम असेल तर हा प्रकल्प रद्द करावा, अशी भूमिका उद्योग व खणिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना मांडली.
शहरात नवीन औद्योगिक धोरणांंबाबत चर्चा करण्यासाठी उद्योजकांचे चर्चासत्र शुक्रवारी सकाळी घेण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तामिळनाडू राज्यातील स्टारलाईट प्रकल्पाला असाच स्थानिकांचा विरोध तीव्र झाला. तरीही सरकारने याची दखल घेतली नाही. प्रसंगी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. यात १४ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करत असल्याचे जाहीर केले.
( नाणार प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा करार )
कोकणातील नाणार परिसरातील असंख्य ग्रामपंचायतींनी या प्रकलपाला विरोध असल्याचे ठराव घेतले. या ठरावाच्या प्रती सरकारकडे पाठविलेल्या आहेत. तामिळनाडूसारखी परिस्थिती कोकणात निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाणार आणि परिसरातील गावांतील लोकांशी चर्चा करावी. त्यांचा विरोध असेल हा प्रकल्प रद्द करावा, अशीच आमचीही भूमिका असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.