परीपूर्तीच्या ध्यासात लौकिक झाला, तरीही माझ्या कलेवर खूश नाही, आय ॲम अनकंप्लिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:29 PM2022-05-11T13:29:22+5:302022-05-11T14:35:32+5:30
औरंगाबादी रसिकांनी अनुभवल्या ‘संतूर’लेल्या मैफली; वेरुळ-अजिंठा महोत्सवात ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते मन मोकळे
औरंगाबाद : ‘काश्मीरमधील सुफी संगीतातील संतूर वाद्याला प्रतिष्ठित करण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पुरे करू शकलो, परिपूर्तीच्या ध्यासात माझाही लौकिक झाला. खरे तर ही त्या वाद्याची पुण्याई आणि माझ्या वाडवडिलांचे आशीर्वाद असावेत. मात्र, तरी पण मी माझ्या कलेवर खूश नाही. आय ॲम अनकंप्लिट...’ हे उद्गार विख्यात संतुरवादक पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांनी २५ नोव्हेंबर २००६ ला वेरुळ-अजिंठा महोत्सवातील सादरीकरणापूर्वी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले होते. त्यावेळीस ही मुलाखत खूप गाजली होती. खुद्द पं. शर्मा यांनी या मुलाखतीचे कौतुक केले होते. त्यांनी मुलाखतीत म्हटले होते की, मी गायकाचा मुलगा,
बनारस घराण्याचे गायक पं. उमादत्त शर्मा हे माझे वडील. तरी संतूरबाबत त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यांनी मला या वाद्याची गोडी लावली आणि मी हातचा तबला सोडला आणि संतूर उचलले. भारतीय संगीत कला केवळ मनोरंजनासाठी नसून, मन:शांती व तंदुरुस्तीसाठीही पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, शास्त्रीय संगीत खूप कठीण आहे, ही सर्वसामान्यांनी मनाशी खूणगाठ बांधलेली आहे. मात्र, तुम्हाला मायकल जॅक्सनचे पॉप म्युझिक समजते का? असा प्रतिसवाल करीत ते पुढे म्हणाले होते की, तरी तुम्ही मेलडीच्या नावाखाली पॉप म्युझिक ऐकताच ना? मग शास्त्रीय संगीताची गोडी चाखा. त्यानंतर सरस्वती भुवन, पं. बहिरगावकर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने पं. शिवकुमार शर्मा औरंगाबादेत आले होते आणि येथील दर्दी रसिकांनी ‘संतूर’लेली अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली होती.
प्रसादजी, आपसे मिलके प्रसन्नता हुई
पं. दिलीप काळे हे माझे गेल्या ४२ वर्षांपासूनचे मित्र आहेत. मागील ४१ वर्षांपासून ते पं. शिवकुमार शर्मा यांच्यासोबत संतूर वादन करत. वेरुळ महोत्सवात पं. शर्मा यांची ओळख झाली होती. सरजी, प्रसाद माझा जिवलग मित्र आहे, तो सुगम गायन करतो, अशी ओळख पं. काळे यांनी करून दिली. तेव्हा पं. शर्मा म्हणाले की, सुगम गायन करते हो? प्रसादजी, आपसे मिलके बडी प्रसन्नता हुई.’ एवढाच आमचा संवाद झाला. पं. शर्मा यांच्या तेजस्वी गोरा चेहऱ्याकडे मी पाहतच राहिलो होतो.
- प्रसाद साडेकर, सुगम गायक