औरंगाबाद : जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा सतत सोशल मिडीयावर पसरविण्यात येत आहे. या अफवातून जमावांनी पकडलेल्यांची सुटका जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केली. या अफवामुळे निरपराध व्यक्तीला मारहाण करीत कायदा होतात घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अधीक्षक कलवानिया म्हणाले, अनोळखी महिला, पुरुष, भिकारीसह इतर कोणतीही व्यक्तीची खातरजमा न करताच केवळ वेशभुषा, हालचालीवरुन मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन जमाव मारहाण करतात. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. या प्रकारच्या तीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत. भोकरदन ते जालना रस्त्यावर सखाराम जाधव यांच्या दुचाकीला कारचालकाने धडक दिली. यात जाधव यांचा नातु दिपक झरे हा गाडीच्या बोनटवर आदळला. त्यास चालकाने आठ किलोमिटरपर्यंत सिल्लोडच्या दिशेने नेले. मुलाच्या ओरडण्यामुळे नागरिकांनी मुले चोरणारी टाळी असल्याच्या संशयावरुन पाठलाग केला. ८०० ते १००० हजार लोकांच्या जमावाने कारची तोडफोड केली. त्यातील पवन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड) याच्यासह एकाला बेदम मारहाण केली. सिल्लोड पोलिसांनी जखमीची जमावाच्या तावडीतुन सुटका केली.
दुसरी घटना सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात घडली. गावातील शाळकरी मुलाचे अपहरण टोळीने केल्याचे पाेलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करीत जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या. चौकशीत ती अफवाच निघाली. वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंद येथे ही मुले पळविण्यात येत असल्याची माहिती पसरवली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी गेल्यानंतर ती सुद्धा अफवाच निघाली. नागरिकांनी कोणतीही माहिती शहनिशा केल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करू नये, अफवांवर विश्वास ठेवु नका असे अवाहनही अधीक्षक कलवानिया यांनी केले. यावेळी एलसीबीचे निरीक्षक रामेश्वर रेंगे उपस्थित होते.
दोन पोलिसांचे निलंबनशहरात गुन्हा नोंदविलेल्या साहेबराव ईखारे या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित केले असून, त्यांच्यावर विभागीय चौकशी समिती बसवली आहे. तर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संतोष वाघ या कर्मचाऱ्याचेही निलंबन केल्याची माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.