औरंगाबाद : शहरातील एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सचिन सुरेश वाघ असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
हडको येथे राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एसटी महामंडळात चालक असून ते पुणे येथे असतात. सध्या सचिनच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरु आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षकाने त्याला प्राचार्याकडे नेले असता तेथे याबाबत प्रक्रिया सुरु असतानाच त्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतली.
मित्राला सांगितले आत्महत्या करतोय यानंतर सचिनने त्याचे मित्र शुभम राठोड, आणि सौरभ रणदिवे यांना फोन केला. सौरभ हा एमआयटी महाविद्यालयातच आहे त्याचीसुद्धा परीक्षा सुरु असल्याने त्याने फोन उचला नाही. तर शुभम त्याच्या घरी होता. शुभमला सचिनने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावर शुभने तत्काळ सौरभला फोन लावला. सचिन आणि शुभम दोघांचे फोन आल्याने सौरभने त्याचा फोन उचला. शुभमने त्याला सचिन महाविद्यालयात आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावर सौरभ परीक्षा हॉलमधून धावत बाहेर आला. तर त्याला सचिन समोरच्या इमारतीवर चढलेला दिसला. सौरभने त्याला वाचविण्यासाठी इमारतीकडे धावला मात्र तोपर्यंत सचिनने खाली उडी घेतली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
त्याला कॉपी करताना पकडले होते सचिन वाघ याला कॉपी करताना पकडले होते. त्याच्या कुटुंबीयांना याची कल्पना देताना घाबरून त्याने उडी घेतली असण्याची शक्यता संचालक मुनीश शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पहा व्हिडिओ : विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न