शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:05 PM2020-10-07T13:05:33+5:302020-10-07T13:06:05+5:30
दि जैन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घटक चाचणी आणि रोजचा वर्ग जाॅईन करण्यासाठी लिंक देण्यास नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी शाळा गाठून शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व रोजचे वर्ग थांबवू नका, अशी मागणी केली.
औरंगाबाद : दि जैन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाने शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घटक चाचणी आणि रोजचा वर्ग जाॅईन करण्यासाठी लिंक देण्यास नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी शाळा गाठून शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व रोजचे वर्ग थांबवू नका, अशी मागणी केली.
सीबीएसईच्या नियमाप्रमाणे शुल्क भरायला पालक तयार आहेत. आकारलेल्या शुल्काची ट्युशन फी म्हणून शाळेने पावती द्यावी. लॉकडाऊनमध्ये पालकांची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे यात विद्यार्थ्यांचे शिक्षण भरडले जाऊ नये, अशी पालकांची इच्छा आहे.
शाळेकडून विद्यार्थ्यांना अनेक वस्तू घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये जी स्टेशनरी बाहेर २ ते अडीच हजारांना मिळत आहे, ती विद्यार्थ्यांना ४,७०० रूपये देऊन शाळेतून खरेदी करावी लागत आहे. शुल्क कमी केल्याशिवाय व पालकांना शाळेने सहकार्य केल्याशिवाय शुल्क भरणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.
शाळेत १५०० विद्यार्थी असून एप्रिल महिन्याच्या शेवटीपासून विद्यार्थ्यांचे क्लास सुरू आहेत. १०० पेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. शाळेने ५,५०० रू. फीमध्ये सवलतही दिली आहे. अनेकवेळा विनंती करूनही पालक पैसे भरायला तयार नाहीत. यात अनेक जणांची मागील वर्षीची फीसही बाकी आहे. मग शाळा चालवायची कशी, असा मुद्दा प्राचार्य पी. संतोष कुमार यांनी मांडला आहे.