घाटीत पुन्हा ‘सुक्रे पॅटर्न’, मध्यरात्री अधिष्ठातांचा अचानक ‘राऊंड’
By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2023 05:21 AM2023-12-22T05:21:19+5:302023-12-22T05:23:19+5:30
कामचुकारपणा करणाऱ्यांची ‘झोप’ उडाली असून, डाॅ. सुक्रे यांच्या पाहणीत काही त्रुटी सापडणार नाही ना, याची अनेकांना धास्ती पडली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठातापदाची सुत्रे हाती घेताच डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी ‘सुक्रे पॅटर्न’ सुरु केला आहे. गुरुवारी मध्यरात्री ते अचानक रुग्णालयात पाहणीसाठी दाखल झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामचुकारपणा करणाऱ्यांची ‘झोप’ उडाली असून, डाॅ. सुक्रे यांच्या पाहणीत काही त्रुटी सापडणार नाही ना, याची अनेकांना धास्ती पडली आहे.
डाॅ. सुक्रे यांनी यापूर्वी घाटीचे वैद्यकीय उपअधीक्षक , अधीक्षक, उपअधिष्ठाता म्हणून त्यांची कारकिर्द गाजली आहे. त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्याची चुणूक या काळात प्रकर्षाने दिसून आली होती. आता त्यांच्या हाती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कारभार आला आहे. त्यांनी त्यांच्या कामाचा धडाका सुरु केला आहे. गुरुवारी मध्यरात्री डाॅ. सुक्रे अचानक सर्जिकल इमारतीत दाखल झाले. यावेळी अपघात विभागापासून तर प्रसूती विभागापर्यंत विविध वार्डांत जाऊन त्यांनी पाहणी केली. स्वच्छता, ठिकठिकाणी अंधार, पंखे नसणे, जमिनीवर उपचार घेण्याची अधिक संख्या पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना यासंदर्भात सक्त सुचना केल्या.