औरंगाबाद : शहरात मे महिन्यात आता सूर्य आग ओकत असून, सोमवारी चिकलठाणा वेधशाळेत ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यासह गेल्या २ वर्षातील उच्चांकी तापमान ठरले आहे. मे महिन्यातील हे गेल्या ५ वर्षातील उच्चांकी तापमान असून रणरणत्या उन्हाने आणि उकाड्याने जिवाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, शहरात २८ एप्रिल रोजी तापमानाचा पारा ४२.४ अंश सेल्सिअसवर गेला होता. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान होते. परंतु उच्चांक अवघ्या काही दिवसांत मोडला गेला आणि नव्या उच्चांकी तापमानाची नाेंद झाली. सोमवारी एकाच दिवसांत तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. चिकलठाणा वेधशाळेत रविवारी ४०.२ अंश तापमान नोंदवले होते. एप्रिल महिन्यातही नागरिकांना उच्चांकी तापमानाला सामोरे जावे लागले. आता मे महिन्यातही शहरवासीयांना उन्हाचा तडाखा बसत आहे. रणरणत्या उन्हातून ये-जा करताना उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत.
लहान मुलांना जपालहान मुलांना उन्हाचा फटका बसत आहे. अतिसारामुळे घाटीतील बालरोग विभागात दररोज २ ते ३ बालके येत असल्याची माहिती विभागप्रमुख डाॅ. प्रभा खैरे यांनी दिली. लहान मुलांनी दुपारच्या वेळी बाहेर खेळू नये, दुपारी बाहेर पडताना टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधावा, छत्रीचा वापर करणे, सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करावी, घराबाहेर पडताना जवळ पाण्याची बाटली बाळगावी. गरजेप्रमाणे मधून-मधून पाणी प्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.
एमजीएम वेधशाळेत ४१.६ अंशांची नोंदशहरातील एमजीएम वेधशाळेत ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळा आणि येथील यंत्रणा वेगवेगळी असल्याचे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
यापूर्वीचे उच्चांकी तापमानवर्षे- कमाल तापमान (अंश सेल्सिअस)२०१६-४३.८२०१७-४१.८२०१८-४२.६२०१९-४३.६२०२०-४३.१२०२१- ४०.६