सुषमा अंधारे बहिणीसमान, बायकोकडून ओटी भरली होती; संजय शिरसाटांनी आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 03:31 PM2023-03-28T15:31:17+5:302023-03-28T15:32:30+5:30
ठाकरे गटाच्या महिलांकडून आमदार शिरसाट यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. आता, या निषेधानंतर संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय
मुंबई/छत्रपती संभाजीनगर - शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या विधानावरुन महिला आघाडीमध्ये असंतोष पसरला आहे. ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध दुपारच्या सुमारास जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातील ठाकरे गटाच्या महिलांकडून आमदार शिरसाट यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. आता, या निषेधानंतर संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
सुषमा अंधारे यांना मी बहिणी मानतो, आमचं बहिण आणि भावाचं नातं आहे. माझ्या बायकोनं त्यांची ओटी भरली होती, असे म्हणत माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं आमदार शिरसाट यांनी म्हटलंय. लफडी या शब्दाचा अर्थ, आर्थिक घोटाळ्याशी संबंधित होता, तुमची आर्थिक हितसंबंधाची लफडी अशा आशयाने होता, असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलंय. त्यासोबतच, महिला म्हणून त्यांनीही बोलताना विचार करायला हवा. त्या आम्हा सगळ्यांना भाऊ म्हणतात आणि संज्या म्हणून बोलतात. मला वरातीतील घोडा असं त्या म्हणाल्या, त्यांना हे शोभतं का? असा प्रतिप्रश्नही शिरसाट यांनी केलाय. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला आक्रमक
आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेले विधान ऐकून शिवसेना ठाकरे गटात महिला आघाडी संतप्त झाली आहे. आमदार शिरसाठ यांच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि शेण खाऊ घालत आंदोलन केले. संजय शिरसाट यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय ,मिंधे सरकार हाय, हाय, शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, दुर्गा भाटी आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.