छत्रपती संभाजीनगर : बुलडाण्यातील खामगाव येथे फळे घेऊन गेलेल्या एका तरुण चालकाचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. अमोल सुरेश अस्तुरे ( ३४,रा. राठी संसार कॉम्प्लेक्स, पिसादेवी रोड ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान अमोलच्या नातेवाईकानी हा अपघातात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे.
अमोल अस्तुरे हा छोटा हत्ती चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. २० फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शहरातून फळे घेऊन गेला होता. तेथे ऑर्डर मागविणारे मजूर फळ गाडीतून उतरवीत होते. त्यामुळे अमोल त्यांना मी जेवण करून येतो म्हणून गेला. त्यानंतर तो खामगाव सरकारी दवाखान्यात दाखल झाला. तो येत नसल्याने व्यापाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून सांगितले. तसेच खामगाव पोलिसानी देखील माहिती दिली. नातेवाईकांनी खामगावला धाव घेऊन पाहिले असता अमोलच्या डोक्यावर गंभीर दुखापत होती. मात्र रुग्णालयात अपघाताची नोंद करण्यात आली होती. नातेवाईकांनी अमोलला घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद आहे.
भावाचा खून केलामाझा भाऊ हा खामगाव येथे फळ घेऊन गेला होता. तेथे गाडी ठिकाणावर पोहचवून तो जेवण करण्यासाठी गेला. तेव्हा त्याला अज्ञात लोकांनी मारहाण करून लुटले. पोलीस म्हणतात, अपघातात पण त्याला फक्त डोक्यावर मार आहे. पैसे गायब असून त्याचा खून करण्यात आला असल्याचा आरोप त्याचा भाऊ निलेश अस्तुरे यांनी केला. तसेच अंत्यविधी झाल्यानंतर याविषयी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.