बसस्थानकात गर्दीत संधी साधत मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन महिला पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 07:47 PM2021-01-08T19:47:02+5:302021-01-08T19:50:53+5:30
crime news पोलिसांनी खाक्या दाखविताच संशयित महिलांनी चोरीचे दागिने काढून दिले .
औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र, पैशाच्या पाकिटासह मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या तीन चोरट्या महिलांना क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पकडले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
रविना गणेश ऊर्फ पप्पू काळे, कुशिवर्ता विक्रम भोसले आणि सोनाली पवन पवार (तिघीही रा. वर्दे, आरणगाव रोड, अहमदनगर) अशी संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकात औरंगाबाद ते शहादा बसमध्य किरण भिकालाल गायके या चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिलांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. सोन्याचे काही मणी गायके यांच्या साडीत अडकले होते. ते सोन्याचे मणी त्यांनी जमा केले.
या प्रकारानंतर किरण यांनी पतीच्या मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. भिकालाल यांनी तात्काळ बसस्थानकातील पोलिसांना घडलेला प्रकार कळविला. पोलीस चौकीतील जमादार चंद्रकांत पोटे यांनी नागरिकांच्या मदतीने चोर महिलांचा शोध सुरू केला. तेव्हा संशयित महिला बसमधून पळण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांना दिसले. महिला सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले.
या घटनेनंतर सोनाली किरण गायके (वय २१, रा. कासलीवाल तारांगण हौसींग सोसायटी, पडेगाव) आणि उषा कैलास पाटील (६०, रा. एन-९, एम-२-१२/४, सिडको) यांच्या गळ्यातील सोन्याचे ४० मणी, एक सोन्याचे पेंडलसह पोत हातचलाखीने कापून पळविल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संशयित महिलांनी ते दागिने काढून दिले .