सावरकर गौरव यात्रेतून ‘वज्रमूठ’ वर निशाणा; ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर, भाजपा-शिंदे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:28 PM2023-04-03T13:28:12+5:302023-04-03T13:28:39+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आल्यास दुकान (शिवसेना) बंद करील. असे ठामपणे सांगितले होते.

Targeting 'Vajramuth sabha' from Savarkar Gaurav Yatra in Chhatrapati Sambhajinagar; The criticism of the BJP-Shinde group that the thoughts of Shiv Sena chief have been forgotten | सावरकर गौरव यात्रेतून ‘वज्रमूठ’ वर निशाणा; ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर, भाजपा-शिंदे गटाची टीका

सावरकर गौरव यात्रेतून ‘वज्रमूठ’ वर निशाणा; ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर, भाजपा-शिंदे गटाची टीका

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विसरून त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेच्या लालसेपोटी घरोबा केल्याची टीका स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या गौरव यात्रेेप्रसंगी भारतीय जनता पार्टी व शिवसेना-शिंदे गटाने रविवारी केली. समर्थनगर येथील स्वातंत्र्य वीर सावरकर चौक ते राजाबाजार संस्थान गणपतीपर्यंत काढलेल्या यात्रेत सावरकर म्हणजे तेज, त्याग, समर्पण असल्याचा सूर आळविण्यात आला.

पालकमंत्री संदीपान भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय कौडगे, विभागातील यात्रेचे प्रमुख संजय केणेकर, आमदार संभाजी निलंगेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, भगवान घडमोडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, हर्षवर्धन कराड, सुहास दाशरथे आदींच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली.
‘यात्रा तो चिंगारी है, आग तो अभी बाकी है’, असे केणेकर म्हणाले. आमदार निलंगेकर म्हणाले, कौरवांची, अधर्माची सभा तिकडे तर इकडे पांडवांची धर्मसभा सुरू आहे. तिकडे ‘औरंगाबाद’ची सभा आहे, इकडे छत्रपती संभाजीनगरची सभा आहे.

ठाकरेंनी विचारांशी फारकत घेतली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आल्यास दुकान (शिवसेना) बंद करील. असे ठामपणे सांगितले होते. परंतु उद्धव यांनी त्यांच्या विचारांशी फारकत घेतली. त्यांची शहरातील होत असलेली सभा ही विचारांची नसून सत्तेच्या लालसेची वज्रमूठ आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान करीत आहेत. गांधी यांना हिंदुत्व विचारांशी काही देणे घेणे नाही, आणि त्यांच्यासोबत ठाकरेंनी नाळ जुळवून घेतली आहे.
-डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

कुबड्या घेऊन वज्रमूठ आवळली
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन सभा घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणाऱ्या राहुल गांधींचे विचार ठाकरेंच्या पचनी पडत आहेत. हिंदुत्वाच्या जागराची ही यात्रा असून, सभेमुळे काढलेली यात्रा नाही. ठाकरेंनी स्वतंत्र सभा घेऊन दाखवावी.
-अतुल सावे, सहकारमंत्री

बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्यासोबत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांच्या विरोधात अपशब्द काढत आहेत. यातूनच त्यांचा कुणाबद्दल द्वेष आहे, हे लक्षात येते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ठाकरेंच्या सभेला गर्दी होणे शक्य नव्हते, म्हणून मराठवाड्यातून गर्दी आणावी लागली. आघाडीच्या सभेमुळे गौरव यात्रा काढलेली नाही.
-संदीपान भुमरे, पालकमंत्री

गौरव यात्रेतील क्षणचित्रे :
-समर्थनगरातील सावरकर चौकात भाजप नेत्यांचे भाषण सुरू असताना दुसऱ्या बाजूने ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्या 'उद्धव ठाकरे जिंदाबाद' ,' जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करत सभेकडे जात होत्या.
-सावरकर गौरव यात्रेत महिलांचा उत्साह मोठा होता. फेटे बांधून व केशरी साड्या नेसून महिला आल्या होत्या. १७ वॉर्डातून पहिल्या दिवशी यात्रा फिरली. समर्थनगर ते राजाबाजारपर्यंत यात्रेचा मार्ग. सोमवारी सावरकरांवरील लेझर शो टीव्ही सेंटर येथे होईल.
-सावरकर चौकात महाविकास आघाडीच्या सभेचे होर्डिंग्ज लागले होते. त्यावर बाळासाहेबांचा फोटो नव्हता. त्यावर यात्रेप्रसंगी नेत्यांनी टीका केली. बाळासाहेब ठाकरे इकडे आहेत, तिकडे नाहीत, हे ठाकरे गटाला कळाले असावे, असा टोला पालकमंत्र्यांनी लगावला.
-गौरवयात्रा चौकाचौकांत पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. एका रथात स्वातंत्र्यवीर सावरकरांची वेशभूषा केलेला युवक लक्ष वेधून घेत होता. ९ वाहनांवर स्वा. सावरकर यांचे जीवनचरित्र दाखविण्यात येत होते. मी पण सावरकर लिहिलेल्या टोप्या यात्रेत सहभागी झालेल्यांनी घातल्या होत्या.
--गौरव यात्रा राजाबाजार जैन मंदिर व संस्थान गणपती चौकात येताच जोरदार आतषबाजी करण्यात आली. तेथे गणपतीची महाआरती करण्यात आली. ८ वाजता यात्रा राजाबाजारात पोहोचली. जे धर्म, संस्कृती विसरले, त्यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करीत संस्थान गणपती येथे यात्रेचा समारोप झाला.

Web Title: Targeting 'Vajramuth sabha' from Savarkar Gaurav Yatra in Chhatrapati Sambhajinagar; The criticism of the BJP-Shinde group that the thoughts of Shiv Sena chief have been forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.