शिक्षकांना पदोन्नती आताच नाही; पण आक्षेप मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:06 PM2019-04-09T19:06:24+5:302019-04-09T19:07:58+5:30
विस्तार अधिकाऱ्यांची मान्य पदांपेक्षा कार्यरत संख्या जास्त
औरंगाबाद : आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल. त्यावेळी प्रशासनाची धावपळ होणार नाही. सेवाज्येष्ठता यादी तयार राहील, या हेतूने प्राथमिक पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची सेवाज्येष्ठता यादी शिक्षण विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. दरम्यान, आक्षेप मागविण्यासाठी नेहमीच याद्या प्रसिद्ध केल्या जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणतात, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची १९ पदे मंजूर आहेत; परंतु आपल्याकडे २५ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. मान्य पदांपेक्षा ही संख्या अधिक आहे. त्यामुळे या पदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविता येणार नाही. केंद्रप्रमुखांचा पदोन्नतीचा कोटा भरलेला आहे. ज्या रिक्त जागा आहेत, त्या सरळसेवेद्वारे राज्यस्तरावरून भरल्या जातील. मुख्याध्यापकांच्या ६७ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांच्या ८० टक्के म्हणजे ४८ पदे पदोन्नतीने भरण्याची मुभा आहे. मात्र, पदोन्नतीद्वारे राखीव जागा भरण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील १० ते १२ जागा मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीने भरता येतात.
प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या ३३७ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा विज्ञान पदवीधरांमधून भरावयाच्या आहेत; परंतु यासाठी नोकरीत येण्यापूर्वी बी.एस्सी., बी.एड. पदवीधारक असणाऱ्या शिक्षकांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. अनेक शिक्षकांनी सेवेत असताना बी.एस्सी. केलेली आहे. त्यांना या पदावर पदोन्नती देता येत नाही.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत वर्षभरापासून पदोन्नती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकली जात आहे. सध्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर शिक्षक आदी पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होत आहेत. त्यामुळे या पदांच्या रिक्त जागांमध्ये सतत वाढच होत आहे. प्रशासनाने पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेऊन रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी शिक्षक संघाचे मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे व अन्य शिक्षकांनी केली आहे. दरवर्षी केवळ दिखावा म्हणून आक्षेप याद्या प्रसिद्ध केल्या जातात. शिक्षकांकडून आक्षेप मागविले जातात; पण पुढे काहीच होत नाही.
याद्या प्रसिद्ध करणे हे नियमित काम
सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे, हे नियमितचे काम आहे. आम्ही संकेतस्थळावर सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. शिक्षकांकडून आक्षेप मागविले आहेत. तूर्तास पदोन्नतीची प्रक्रिया राबविता येत नाही; परंतु आचारसंहिता उठल्यानंतर ती राबविता येईल. या हेतूने सेवाज्येष्ठता यादी तयार ठेवली जाणार आहे. ५१० मुख्याध्यापक, १४००-१५०० पदवीधर शिक्षक, ५२ केंद्रप्रमुख आणि सुमारे ८२५० प्राथमिक शिक्षकांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
- एस. पी. जैस्वाल, शिक्षणाधिकारी