औरंगाबाद : शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना ठाकरे कुटुंबाने औरंगाबादकरांची जाहीररित्या माफी मागितली होती. त्यानंतर कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आज पूर्ण करण्यात आला आहे असे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, रेणुकादास वैद्य, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले, शहरात सन २०५२ पर्यंत पाणी योजनेचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी केले असून याकरिता १६८० कोटी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी येणार आहे. नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर येऊ न देण्याची जबाबदारी पार पाडावी आणि विघटन होणारा ओला कचरा मनपाच्या घंटागाडीत जमा करावा, असे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले. पडेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी देखील केली.
घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चिकलठाणा (१५० मे. टन), पडेगाव (१५० मे. टन) , नारेगाव (१५० मे. टन) येथे कचऱ्यावर प्रक्रिया केंद्राचे काम पुर्णत्वास असून पडेगाव येथे प्रक्रिया शेड, प्लॅटफॉर्म, संरक्षण भिंत, लिचडटँक, ऑफीस इमारत इत्यादी कामे पुर्ण झाली आहे. पडेगाव येथे घनकचरा प्रक्रिया बाबतची मशिनरी बसविण्यात आली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय प्रास्ताविकात दिली.