छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-११ आणि एन-९ येथे राहणाऱ्या बर्वे, बोरूडे कुटुंबीयांवर रविवारी सकाळी दु:खाचा डोंगरच कोसळला. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या दु:खात आधार देण्यासाठी मंगळवारी सकाळी मुस्लीम समाज सरसावला. समाजातील प्रमुख मान्यवरांनी दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
हडको एन-११ द्वारकानगर भागात राहणाऱ्या रवींद्र बर्वे, एन-९ टी.व्ही. सेंटर येथील राजू बोराडे यांची माजी महापौर रशीद मामू, जमीयत उल उलेमाचे शहराध्यक्ष खलील खान, शफीक मिल्ली, आरेफ मुनीर खान, इब्राहिम मुल्ला, ॲड. मुखीद, सतीश कामेकर यांनी भेट घेतली. दोन्ही कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या दु:खातून सावरण्यासाठी त्यांना धीर देण्यात आला. रुग्णालयात जखमी असलेल्यांसोबत स्वत:चीही काळजी घ्या, असे मुस्लीम समाजातील मान्यवरांनी नमूद केले.
‘लोकमत’शी बोलताना रशीद मामू म्हणाले की, हिंदू- मुस्लीम एकता ही या शहराची संस्कृती आहे. ही संस्कृती भविष्यातही अबाधित राहावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज या दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या सांत्वनासाठी येणे हे आमचे कर्तव्य होते. अनेक हिंदू बांधव आजही आमच्या सुख- दु:खात आवर्जून सहभागी होतात. दोन समाजांत कोणी कितीही द्वेष पसरविला, तरी काहीच उपयोग होणार नाही.