औरंगाबाद : नशेखोरांना विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने आणलेला गुंगीवर्धक नशेच्या गोळ्यांचा साठा, खोकल्याच्या औषधीसह उस्मानपुरा पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपी हा एका औषधी एजन्सीमध्ये सेल्समन आहे. तो स्टॉक रजिस्टरमध्ये हेराफेरी करून नशेखोरांना थेट औषध विक्री करायचा. आरोपीविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तौफिक रफिक फारुकी (४१, रा.ब्रिजवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुले, तसेच शहरातील अनेकांना औषधी गोळ्या, खोकल्याच्या औषधांचा नशेसाठी वापर करण्याचे व्यसन जडले आहे. ही नशेखोर गुंगीकारक औषधी गोळ्या खाऊन गुन्हे करीत असतात, शिवाय त्यांच्या शरीरावर याचा विपरित परिणाम होतो. उस्मानपुरा परिसरातील प्रतापनगर मैदानाजवळ नशेच्या गोळ्या, औषधी विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची गुप्त माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली. यानंतर, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, विनोद अबूज, हवालदार लांडे पाटील, फरहत शेख, योगेश गुप्ता, अशरफ सय्यद, सतीश जाधव आणि संदीप धर्मे यांच्या पथकाने औषधी निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांच्यासह सोमवारी रात्री प्रतापनगर येथील मैदानाजवळ सापळा रचला, तेव्हा तेथे दुचाकीच्या हॅण्डलला कापडी पिशवी लटकावून आलेल्या आरोपी तौफिकला त्यांनी संशयावरून ताब्यात घेतले.
यावेळी पंचासमक्ष त्याच्या बॅगची झडती घेतली असता, कापडी बॅगेत खोकल्याच्या औषधाच्या पाच बाटल्या, अलप्रझोलम नावाच्या ३०० औषधी गोळ्या, लोराझेपम नावाच्या ५४० गोळ्या आणि अल्ट्राकॅट नावाच्या ३० औषघी गोळ्या आढळून आल्या. ही सर्व औषधी शेड्युल्ड एच १ या प्रकारात मोडतात. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नोंदणीकृत औषधी विक्रेता कुणालाही ही औषधी विकू शकत नाही, शिवाय विक्री केलेल्या औषधांची नोंद ठेवण्याची जबाबदारी औषध दुकानदाराची असते. या औषधी गोळ्याविषयी आरोपींकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नशेखोरांना औषधी विक्री करण्यासाठी त्याने ही औषधी आणल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने, त्याच्याविरोधात उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
सेल्समनची हेराफेरी नशेखोरांना गुंगीकारक झोपेच्या गोळ्या विक्री करणारा आरोपी तौफिक हा एका औषधी एजन्सीमध्ये सेल्समन आहे. तो स्टॉक रजिस्टरमध्ये हेराफेरी करून शहरातील औषधी दुकानदाराच्या नावाने माल बाहेर काढायचा. हा माल तो परस्पर नशेखोरांना विक्री करून बक्कळ कमाई करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेड्युल्ड एच औषधीबाबत एजन्सीचे बेजबाबदार वर्तनपोलिसांनी सांगितले की, शेड्युल्ड एच प्रकारातील औषधीबाबत शासनाची कडक नियमावली आहे. आरोपींकडे सापडलेल्या औषधी गोळ्या मानवी शरीरावर अत्यंत घातक परिणाम करतात. अलप्राझोलमची एक गोळी सेवन केल्यानंतर रुग्ण २४ तास झोपतो. शिवाय पुढील २४ तास तो नशेच्या अंमलाखाली असतो. औषधी दुकानदाराची लेखी ऑर्डर असल्याशिवाय औषधी एजन्सीचालकालाही औषधी त्यास देता येत नाही. शिवाय सेल्समनमार्फत पाठविलेली औषधी त्या औषधी दुकानदाराला पोहोचल्याची पावतीही घेणे त्यास बंधनकारक असते. मात्र या औषधांबाबत एजन्सीचालकाचे वर्तन अत्यंत बेजबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितले.