- संतोष हिरेमठऔरंगाबाद : आमदार आणि मंत्र्यांच्या उपचारासाठी औरंगाबादपासून तर मुंबईपर्यंतची सर्व यंत्रणा कामाला लागत असल्याचे महिनाभरात दिसले. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधींनी अँजिओप्लास्टिसाठी मुंबई गाठल, पण गोरगरीब रुग्णांनी काय करावे, असा प्रश्न आहे. कारण घाटी रुग्णालयात वर्षभरानंतरही केवळ परिचारिका मिळत नसल्याने ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे आमदार, मंत्र्यांची काळजी घेणारे शासन गोरगरीब रुग्णांची कधी काळजी घेणार, सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये पदे कधी भरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
औरंगाबादेतील एका लोकप्रतिनिधींना हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात आले. तेथे त्यांची अँजिओप्लास्टी झाली. त्याबरोबर शहरातील सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन एका मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयांवरील विश्वास वाढण्यासाठी हातभार लावला. लोकप्रतिनिधींची जेवढी काळजी घेतली जाते, तेवढीच काळजी गोरगरीब रुग्णांची घेण्यासाठी सोयीसुविधा वाढविण्यासाठी हातभार लावण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. परिचारिका मिळाल्या तर अवघ्या ८ दिवसांत अँजिओप्लास्टी सुरू केली जाईल, असे घाटीने ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर केले होते. मात्र, वर्षभरानंतरही मनुष्यबळ मिळालेले नाही. सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये ‘ॲँजिओग्राफी’च्या सुविधेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली, पण अँजिओग्राफी करताना एखाद्या रुग्णात गुंतागुंत झाली तर उपचारासाठी वरिष्ठ निवासी डॉक्टर व ऑपरेशन थिएटर असिस्टंट उपलब्ध नाहीत.
हवे ८६ नर्सिंग स्टाफ, भरले केवळ एक पदसुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये मनुष्यबळात प्रामुख्याने नर्सिंग स्टाफ व इतर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नाही. मंजूर असलेल्या ८६ नर्सिंग स्टाफपैकी केवळ एक पद भरलेले आहे. तसेच अँजिओग्राफी करताना काही गुंतागुंत झाल्यास, एखाद्या रक्तवाहिनीवर तातडीने उपचार करण्यासाठी लगेच ऑपरेशन थिएटर लागते. परंतु त्यासाठीही आवश्यक वरिष्ठ निवासी डॉक्टर व ऑपरेशन थिएटर असिस्टंट उपलब्ध नाहीत.
‘डीएमईआर’ स्तरावर प्रक्रियावर्ग-३ म्हणजे परिचारिकांची भरती झाल्याशिवाय सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये अँजिओप्लास्टिची सुविधा सुरू करता येणार नाही. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयस्तरावर (डीएमईआर) प्रक्रिया सुरू आहे. वर्ग-४ च्या पदांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, ही प्रक्रिया रद्द करण्याची सूचना आली. शासन स्तरावर दोन संस्थांची निवड करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून वर्ग-४ चे मनुष्यबळ मिळेल. डाॅक्टरांची पदे बऱ्यापैकी भरली आहेत.- डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर, अधिष्ठाता, घाटी.
पाठपुरावा करूघाटीतील अँजिओप्लास्टीच्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. सुविधा लवकर सुरू होण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करू.- आ. प्रदीप जैस्वाल, अध्यक्ष, अभ्यागत समिती, घाटी.