लग्नाचा आनंद शोकसागरात बदलला; कन्यादानानंतर बेपत्ता पित्याचा मृतदेह तलावात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:00 PM2022-02-23T15:00:17+5:302022-02-23T15:00:55+5:30
लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याने नवदाम्पत्य व दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : मुलीच्या कन्यादानानंतर बेपत्ता झालेल्या पित्याचा मृतदेह मंगळवारी साजापूरच्या पाझर तलावात सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे मुलीच्या सासर व माहेरकडील मंडळींना चांगलाच धक्का बसला असून दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. (The body of the missing father was found in the lake after Kanyadana)
समीर चाँद शाह (रा.चांदवड जि.नाशिक) हे पत्नी शाहीनबी, मुलगा साहिल व मुलगी सानिया यांच्यासह गत सहा-सात वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात साजापुरात स्थायिक झाले होते. वाहनचालकाचे तसेच मिळेल ते काम करून त्यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. चार दिवसांपूर्वी १८ फेब्रुवारीला त्यांनी कन्या सानिया हिचा विवाह समीर शेख या तरुणासोबत थाटामाटात लावून दिला. लग्नानंतर रविवारी ढोरकीन येथे वलीमा (रिसिप्शन)चा कार्यक्रम असल्याने समीर शाह कुटुंब व नातेवाईकांसोबत ढोरकीनला गेले. नंतर सर्व कुटुंबीय साजापूरला परतले.
कन्यादानानंतर बेपत्ता पित्याचा मृतदेह तलावात सापडला
कार्यक्रमानंतर थकलेले कुटुंबीय व नातेवाईक घरात झोपी गेले. सोमवारी सकाळी समीर शाह हे घरात न दिसल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यांचा मोबाइलही बंद होता. मंगळवारी सकाळी साजापूरच्या पाझर तलावात एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करून मृतदेह बाहेर काढला. मयताजवळील कागदपत्रांवरून अनोळखी इसमाची ओळख पटली. तो मृतदेह समीर शहा यांचा होता.
लग्नाच्या आनंदावर विरजण
या घटनेने साजापूरवर शोककळा पसरली. लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याने नवदाम्पत्य व दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. समीर शहा यांनी आर्थिक विवंचनेत टोकाचे पाऊल उचलले की, मृत्यूचे कारण वेगळे आहे, याचे गूढ आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात नोंद करण्यात आली.