औरंगाबाद - केंद्रीय संरक्षण दलाने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेअंर्गत सैन्य भरती लवकरच सुरु होत आहे. औरंगाबादमध्ये अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्नीवीरांचीही भरती केली जात आहे. त्यानुसार, 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पात्र तरुणांची निवड केली जाईल. या भरतीत औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुण सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचले आहेत. मात्र, येथे आलेल्या उमेदवारांची, भावी जवानांची मोठी ससेहेलपाट होताना दिसत आहे. ना खायला अन्न, ना प्यायला पाणी, झोपायलाही आसरा नाही. त्यामुळे, या भरतीच्या विद्यार्थ्यांन मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्निवीरांची भरती सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र, या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. याउलट मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागल्याने युवकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. भावी जवानांचे सुरू असलेले हाल आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे, अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून, न पाणी पिता आणि न काही खाता राहावे लागत आहे. विशेष म्हणजे काही युवकांना रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, युवकांकडून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. तर, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.