सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद 'अनुसूचित जमाती-महिला' प्रवर्गासाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 07:56 PM2022-01-27T19:56:14+5:302022-01-27T19:57:19+5:30
सोयगाव नगरपंचायतच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवून बहुमत मिळविले आहे.
सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यावेळी सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती-महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे बहुमतात असलेल्या शिवसेनेकडून आशाबी अश्रफ तडवी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असतील. विशेष म्हणजे, या प्रवर्गासाठी बहुमतात असलेल्या शिवसेनेकडे एक आणि अल्पमतात असलेल्या भाजपाकडेही एक सदस्य आहे.
सोयगाव नगरपंचायतच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवून बहुमत मिळविले आहे. तर दोन क्रमांकावर भाजप असून त्यांच्याकडे सहा जागा आहेत. या विजयानंतर सत्तार यांनी भाजपचे केंद्रातील मंत्री रावासाहेब दानवे आणि भागवत कराड या दोघांना आव्हान दिले आहे. बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते याची उत्सुकता होती. आज सायंकाळी राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सोयगाव नगराध्यक्ष पद अनुसूचित जमिती - महिला या प्रवर्गासाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आले.
शिवसेने कडे बहुमत असल्याने साहजिक त्यांचा उमेदवार येथे बाजी मारणार आहे. विशेष म्हणजे, भाजपाकडे देखील नगराध्यक्ष पदासाठी या राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे. मात्र, बहुमत नसल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांना दावा करता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा आहे. यामुळे शिवसेनेच्या वॉर्ड क्र-१७ मधून निवडून आलेल्या आशाबी अश्रफ तडवी यांची नगराध्यक्ष पदी वर्णी जवळपास निश्चित झाली आहे.