‘जय नरहरी’चा घोष, बँडच्या तालावर नृत्य, अभंगाचा नाद आणि टाळांचा गजर !
By स. सो. खंडाळकर | Published: August 25, 2023 08:46 PM2023-08-25T20:46:06+5:302023-08-25T20:46:51+5:30
संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी: मिरवणुकीत भगवे फेेटे बांधून सामील झाले सुवर्णकार महिला- बांधव
छत्रपती संभाजीनगर : 'देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार...' या अभंगाचा नाद, टाळांचा गजर आणि 'जय नरहरी'च्या जयघोषाने शुक्रवारी शहर दुमदुमून गेले. सोनार समाजाचे आद्यदैवत संतश्रेष्ठ नरहरी सोनार महाराज यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने खडकेश्वर मंदिर ते संस्थान गणपती अशी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी सोनार पंचायत मंदिर ट्रस्ट, लोटाकारंजा येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर संत नरहरी महाराज चौक, खडकेश्वर येथून दुपारी मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर बापू घडमोडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आ. सुभाष झांबड, भाजपचे प्रदेश सचिव संजय केणेकर, किशोर तुळशीबागवाले, माजी नगरसेविका कीर्ती शिंदे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन कराड आदी उपस्थित होते.
संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेसह फुलांनी सजविलेला रथ, पारंपरिक पेहराव व भगव्या फेट्यातील महिला-पुरूष, भजनी मंडळ आणि फुगड्या - पावलीचे नृत्य यामुळे हा सोहळा देखणा ठरला. सौरव विसपुते याने महादेवाची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. संस्थान गणपती मंदिरात महाआरतीने शोभायात्रेचा समारोप झाला. त्यानंतर भाविकांनी कासलीवाल प्रांगण येथे महाप्रसादाचा लाभ घेतला.
महामंडळ द्या
सोनार समाजाच्या हितासाठी आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी द्यावी, तसेच कारागिरांसाठी फायदेशीर असलेल्या केंद्र सरकारच्या विश्वकर्मा महामंडळांतर्गत देण्यात येणारी १ लाख कर्जाची रक्कम ५ लाख करण्यात यावी, अशी विनंती यावेळी समाजाच्या वतीने ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना करण्यात आली.