शिक्का पुरुष डाॅक्टरचा, ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देते महिला, १०० रुपयांत क्षणात व्यक्ती ‘फिट’
By संतोष हिरेमठ | Published: December 29, 2023 03:10 PM2023-12-29T15:10:27+5:302023-12-29T15:15:01+5:30
कोणीही यावे फिटनेस घेऊन जावे; नाव एका डाॅक्टरचे, नोंदणी क्रमांक दुसऱ्याचाच
छत्रपती संभाजीनगर : शिक्का पुरुष डाॅक्टरचा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र महिला देत आहे; तेही कोणत्याही तपासणीविना. धक्कादायक म्हणजे शिक्क्यावर नाव एका डाॅक्टरचे आणि नोंदणी क्रमांक दुसऱ्याचा असल्याचेही आढळून आले. हा सगळा प्रकार सुरू आहे आरटीओ कार्यालयाच्या परिसरात. अवघ्या १०० रुपयांत वाहन चालविण्यासाठी व्यक्ती काही मिनिटांत ‘फिट’ होऊन जातो.
वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासह इतर कारणांमुळे डाॅक्टरांकडून सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. ‘एमबीबीएस’ डाॅक्टरांकडून हे प्रमाणपत्र घेणे अपेक्षित आहे. आरटीओ कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. यातील अनेकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज पडते. परंतु हे प्रमाण अगदी काही मिनिटांत मिळते. हे प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाला सादरही केले जाते. ते खरे आहे की खोटे, याची पडताळणीच केली जात नाही.
काय आढळले?
आरटीओ कार्यालय परिसरात एका महिलेकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात आले. कोणत्याही तपासणीविना हे प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्रावरील डाॅक्टरचे नाव आणि नोंदणी क्रमांकाची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच ‘महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल’च्या संकेतस्थळावरून पडताळणी करण्यात आली. तेव्हा शिक्क्यावर नमूद डाॅक्टर नाव एकाचे आणि नोंदणी क्रमांक दुसऱ्याचा होता.
ऑनलाइनचे पुन्हा ऑफलाइन
लायसन्सची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने एमबीबीएस डाॅक्टरांनी लायसन्स काढणाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड करावे, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ऑनलाइन लायसन्स प्रक्रियेसाठी आरटीओ कार्यालयाकडून एमबीबीएस डाॅक्टरांना लाॅगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. मात्र, याला काहींनी विरोध केल्याने आता पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्र चालकांच्या हातात दिले जाते. त्यातूनच अनेक गैरप्रकार होत आहेत.
कायद्याने गुन्हा
डाॅक्टरच्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करणे, एका डाॅक्टरचा शिक्का दुसऱ्याने देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याने शिक्षा होऊ शकते.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
बोगस डाॅक्टरांवर कारवाई करावी
बोगस डाॅक्टरांवर कारवाई केली पाहिजे. यासंदर्भात २९ तारखेला बैठक होणार आहे. कोणतीही पदवी नसताना अनेक जण डाॅक्टर म्हणून वावरत आहेत.
- डाॅ. यशवंत गाडे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)
कारवाई होईल
‘एमबीबीएस’ डाॅक्टरचे प्रमाणपत्र असावे लागते. चुकीच्या पद्धतीने हे प्रमाणपत्र देण्याचा प्रकार होत असेल तर कारवाई केली जाईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)