छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणीची जय्यत तयारी केली. मात्र आजपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला नाही. परिणामी जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ २२ टक्के पेरणी झाली. मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटले. सुरुवातीला तीन-चार दिवस आलेल्या पावसाने आता आठवड्यापासून उघडीप दिली.
पैठण, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यातील काही मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. उर्वरित मंडळात मात्र शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले. जिल्ह्यातील एकूण लागवडलायक क्षेत्रांपैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होते. मागील १५ दिवसांत आजपर्यंत केवळ २२ टक्केच क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. तर पेरणी केवळ १६ टक्के झाली. माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली. यात सर्वाधिक कापसाची लागवड झाल्याचे दिसून येते.
पिके पाण्याअभावी होरपळून गेलीयावर्षी वेळेवर आणि मुबलक पाऊस पडणार असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. मात्र तसे झाले नाही. एकदा पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे आमचं खूप नुकसान झाले आहे. यापूर्वी पेरलेले मूग पिके पाण्याअभावी होरपळून गेली आहे. आता पुन्हा नव्याने पेरणी करावी लागेल.-योगेश भागीनाथ गोटे, शेतकरी चिकलठाणा.
पुन्हा पेरणी करावी लागेलचिकलठाणा शिवारात आमची शेती आहे. तेथे काही दिवसापूर्वी सोयाबीन, मका पेरणी केली. तसेच कापसाची लागवड केली. आता पिके उगवली आणि पावसाची खूप गरज आहे, अन्यथा पुन्हा पेरणी करावी लागेल.- कारभारी भागीनाथ गोटे, शेतकरी.
पावसासाठी देवाकडे प्रार्थना चिकलठाणा परिसरात आठ दिवसापूर्वी पाऊस पडला. यानंतर आम्ही पेरणी केली. आता पिके उगवू लागल्याने पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस पडावा, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत आहोत. - अजय नवपुते, शेतकरी