तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाईंनी कामे देताना १० टक्क्यांनी पैसे घेतले: संदीपान भुमरें
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:21 PM2022-11-08T18:21:01+5:302022-11-08T18:22:35+5:30
'मागील पालकमंत्री विमानाने येऊन हॉटेलमध्ये बैठका घेऊन निघून जायचे.'
फुलंब्री (औरंगाबाद) : तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी डीपीडीसीमधील कामे देताना १० टक्क्यांनी पैसे घेतले. कार्यकर्त्यांच्या कामात अडवणूक केली. पैसे दिल्याशिवाय निधी मिळत नव्हता. पैसे दिल्यानंतरच रस्ते आणि विविध विकास कामाला निधी मिळत असल्याचा खळबळजनक आरोप पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज केला. तसेच हे मी पुराव्यासह सिद्ध करून दाखवेल असा दावाही भुमरे यांनी यावेळी केला.
फुलंब्री शहर व तालुक्यातील पाल गावात विविध विकास कामांचे उद्घाटन आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार, माजी सभापती किशोर बलांडे, तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भुमरे यांनी माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, पालकमंत्री झालो तेव्हापासून ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्याच्या कामाला लागलो आहेत. मागील पालकमंत्री विमानाने येऊन हॉटेलमध्ये बैठका घेऊन निघून जायचे. कोणाचे ऐकत नसत, टक्केवारी घेण्याचे त्यांना माहित होते. मी आमदार असूनही कधी त्यांच्या गाडीत बसलो नाही. त्यांच्या गाडीकडे केवळ पाहण्याची संधी होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पालकमंत्री होण्याची संधी मला मिळाली. मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गाडीत घेऊन फिरतो. हा बदल झाल्याचे भुमरे म्हणाले.
तसेच मी संपूर्ण जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. माझ्याकडे कधीही यावे, आपले काम केले जाईल. विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देखील पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, अशफाक पटेल, जमीर पठाण, राउफ कुरेशी, मुद्दसर पटेल, पूजा ढोके, अर्चना उमेश दुतोंडे, हाफीज मन्सुरी , भानुदास तायडे, अजहर सय्यद, फेरोज खानसह अनेकांची उपस्थिती होती.