Video: हायवेवर बर्निंग कारचा थरार, प्रसंगावधान राखल्याने दोघे थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:32 PM2022-05-04T19:32:26+5:302022-05-04T19:33:27+5:30
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव जवळची घटना
सिल्लोड: औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील गोळेगावजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. काही क्षणात कार जळून खाक झाली. वाहन चालक सावध असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात अंदाजे दहा ते अकरा लाखाचे नुकसान झाले. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
वैद्यकीय अधिकारी मोसिन खान (वाहन मालक, रा. सिल्लोड ) व अमीन पठाण (रा. सिल्लोड) हे दोघे अजिंठा येथून सिल्लोडच्या दिशेने कारमधून (एम. एच. 20, एफ वाय 5099) प्रवास करत होते. गोळेगाव जवळ कारने अचानक पेट घेतला. मोसिन खान व अमीन पठाण यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी थांबवली. दोघेही लागलीच खाली उतरल्याने बचावले. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळात संपूर्ण कार जळून खाक झाली.
औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील गोळेगावजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. pic.twitter.com/htBaI9IMv3
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) May 4, 2022
धावत्या कारला आग लागल्याची माहिती अन्य वाहन चालकांनी गोळेगाव येथे येऊन दिली. परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली. गाडीला आग नेमकी कशामुळे लागली ? याचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.