औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पुतळ्याच्या अनावरणावरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने अनावरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता. शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले.
शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. प्रशासन राज्य शासनाकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी अनावरणाची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुतळ्याच्या आजूबाजूला सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईसुद्धा मनपाकडून करण्यात येणार आहे. अलीकडेच मनपा प्रशासक यांनी पुतळ्याची पाहणी केली होती. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
१५ दिवसांतील राजकारणपुण्याहून २३ जानेवारी रोजी रात्री पुतळा शहरात आणण्यात आला. पुतळ्याची उंची वाढवावी, नवीन पुतळा बसविण्याचा ठराव भाजपने मनपा सर्वसाधारण सभेत घेतला होता, म्हणून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. शिवरायांच्या वंशजांकडूनच अनावरण करावे, अशी मागणी करण्यात आली. अनावरणाची तारीख निश्चित होत नसल्यामुळे शहरातील शिवप्रेमींनी महापालिकेला अनावरण करता येत नसेल तर आम्ही स्वत: करू, असा इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासन पेचात सापडले होते. महापालिका प्रशासनाने पुतळ्याच्या अनावरणाचा चेंडू राज्य शासनाकडे टोलविला. शासनच यासंदर्भात अंतिम तारीख निश्चित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शेवटी बुधवारी राज्य शासनाने निर्णय घेतला.
पुतळ्याची वैशिष्ट्ये :रुंदी ८ फूट, उंची २१ फूट, वजन ७ टन,३१ फूट उंच चौथरा, पुतळ्याची उंची ५२ फूटचौथऱ्यास म्युरल्स, कारंजे, सुशोभीकरणब्राँझ धातूचा पुतळा पुण्यात तयार केलाएक कोटी रुपये पुतळ्याचा खर्च१.५० कोटी चौथरा, सुशोभीकरणावर खर्च