औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी मित्राचा आजारपणात मृत्यू झाल्यामुळे त्याच्या विरहात तरुणाने, तर चार दिवसांपूर्वी मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याने लहान भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा वेगवेगळ्या दोन घटना मंगळवारी सातारा परिसरात घडल्या.
याप्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत राहणारा चेतन दिलीप बन्सवाल (२८) याने मंगळवारी दुपारी घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार समोर येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी चेतनला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, चेतनच्या मित्राचा आठ दिवसांपूर्वी आजारामुळे मृत्यू झाला होता. मित्राच्या मृत्यूचा त्याला धक्का बसला. या घटनेपासून तो त्याच्याकडे जायचे आहे, तो बोलावत आहे, अशी बडबड करीत होता. मंगळवारी सकाळी त्याने घरातील मंडळींसोबत कुरबूर केली. यानंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि अचानक गळफास घेतला. संगणकशास्त्रात बीएस्सीपर्यंत शिक्षण झालेला चेतन सुतारकाम करीत होता. यातच त्याने मृत्यूला कवटाळल्याने नातेवाईकांत खळबळ उडाली. या घटनेची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार एस. के. चव्हाण तपास करीत आहेत.
मोठ्या भावाच्या विरहात लहान भावाची आत्महत्याआजारामुळे मोठ्या भावाचा १९ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. मोठ्या भावाच्या विरहात धाकट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सातारा गावात घडली. इरफान शेख सुभान शेख (४३) असे मृताचे नाव आहे. इरफान यांचे मोठे भाऊ अनेक दिवसांपासून आजारी होते. यातच १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून इरफानच्या खांद्यावर भावाच्या आणि स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी आली होती. मात्र, भावाच्या मृत्यूचे मोठे दु:ख त्यांना झाले होते. घटनेपासून ते फारसे कोणाशीही बोलत नव्हते. मंगळवारी सकाळी त्यांनी घरात गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच आरेफ शेख आणि मुस्तफा यांनी त्यांना घाटीत नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार सी. ए. गवांदे तपास करीत आहेत.