छत्रपती संभाजीनगर : जर पन्नासच्या दशकात अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक सुरू झाले असते, तर सर्वांत पहिले हे पारितोषिक जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे उपसंचालक डॉ. रमेश गोलाईत यांनी व्यक्त केला.
‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’च्या (डामा) पदग्रहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात डॉ. गोलाईत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. रेल्वे स्टेशन रोडलगत भानुदासराव चव्हाण सभागृहात रविवारी आयोजित या समारंभाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी या फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. एम.डी. गायकवाड होते.
यावेळी डॉ. गोलाईत म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे असामान्य प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व होते. आधुनिक भारताचे शिल्पकार होते. मात्र, आपण त्यांना घटनेचे शिल्पकार, समाजोद्धारक आणि अन्य काही उपाधी देऊन सीमित केले. ते थोर अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘दी प्राब्लेम ऑफ रुपी’ या आपल्या प्रबंधातून मांडलेले विचार आजही सुसंगत ठरत आहेत. या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातूनच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहिली. महिला सक्षमीकरणासाठी आज विविध योजना, कायदे, निर्णय घेतले जातात. हा विचारही बाबासाहेबांनी तेव्हाच मांडला होता. यावेळी आरोग्य उपसंचालक डाॅ. रामटेके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक या फाउण्डेशनचे सचिव डॉ. विशाल वाठोरे यांनी केले.
५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा संकल्पअध्यक्षीय समारोपात डॉ. एम.डी. गायकवाड म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएन’ने आता वैद्यकीय शिक्षणासोबत हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर, विविध आजारतज्ज्ञ, शिवाय ॲलोपॅथीसह अन्य विविध पॅथींचे डॉक्टर यांच्यासाठी ‘डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केअर फाउण्डेशन’ (डामा) ही एक साखळी तयार केली आहे. या माध्यमातून शहरात लवकरच ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या आंबेडकरी डॉक्टरांसाठी याठिकाणी आरोग्य सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. गरीब रुग्णांसाठी माफक दरात दर्जेदार सेवा दिली जाणार आहे.