औरंगाबाद : शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत. या भागात जलवाहिन्या टाका, पाणी द्या असा आग्रह नगरसेवकांकडून सुरू आहे. नवीन अनधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकणे, पाणी देणे तूर्त शक्य नाही. भविष्यात समांतरचे पाणी आल्यावरच कामे होऊ शकतील, अशी माहिती सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.
सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेवक गजानन बारवाल यांनी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होर्ईपर्यंत पाणीपुरवठ्यात विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रामाणिकपणे मनपाकडे न मागता मालमत्ता कर भरणाऱ्या अधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकल्या जात नाहीत. स्वाती नागरे यांनी सिडको-हडकोला किती पाणी दिले जाते, याचा हिशेब द्या अशी मागणी केली.
कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले की, अनधिकृत वसाहतींमध्ये पाणी द्या म्हणून दबाव टाकण्यात येत आहे. मागील तीन-चार वर्षांमध्ये शहरातील तब्बल ३८ वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच त्यांची तहान भागवावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शहरात पाण्याची मागणी बरीच वाढली आहे. दररोज नवीन समस्या निर्माण होत आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून किमान १ तास तरी पाणी द्या, अशी सूचना सभापती राजू वैद्य यांनी केली.