खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील सोनखेडा गावात ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राजकारणामुळे गेल्या बारा दिवसापासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील गदाणा जि.प.गटातील सोनखेडा गाव असून या गावात गेल्या दोन महिन्यापासून पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. विशेष म्हणजे या जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुरेश सोनवणे यांचे हे गाव आहे. गावातील दोन विहिरी तालुका प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा आदेश असतानाही अंतर्गत वादामुळे या विहिरी आजही अधिग्रहीत झाल्या नाहीत. आज खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात सोनखेडा गावातील पाणीप्रश्नावरून चर्चा झाली. यात ज्यांच्या विहिरी अधिग्रहण केल्या आहेत ते शेतकरी पाणी संपल्याचे कारण देत पाणी देण्यास तयार नाहीत.
पाणीप्रश्न गंभीर असतांनाही गावातील राजकारणामुळे जो तो दुस-याच्या विहिरीला पाणी जास्त असल्याचे सांगत होता यावरून गावातील राजकारण पाण्यावरून चांगलेच पेटले असल्याचे दिसून आले. यातच गावात टँकरने पाणीपुरवठा करावा असे काहींचे मत आहे. पंरतू, ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव ही प्रशासनास दिला नसल्याने गावात पाण्याची सर्वत्र बोंबाबोंब आहे. याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे.