दारू पिल्यानंतर तिर्रट खेळताना वाद झाला; संतप्त चुलत भावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:15 PM2022-05-04T19:15:15+5:302022-05-04T19:15:29+5:30
दोघेही दारूच्या नशेत तर्र असल्याने वादाचे रूपांतर काळावेळेनंतर हाणामारीत झाले.
खुलताबाद : तालुक्यातील-पिंप्री येथे दारू पिऊन सुरू असलेल्या पत्त्याच्या डावात झालेल्या मारहाणीत सतीश गुलाब गोमलाडू (२५) हा युवक गंभीर जखमी झाला होता. घाटीत उपचार सुरू असताना तेराव्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शनिवारी पित्रापुत्र अशा दोघांवर खुलताबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तळपिंप्री शिवारातील आझमपूर फाट्यावर सतीश गुलाब गोमलाडू व रणजित विठ्ठल गोमलाडू (२०) हे दोघे चुलतभाऊ रविवारी (दि.१७ एप्रिल) दारू प्राशन करून तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. यावेळी दोघांमध्ये पत्त्याच्या डावावरून वाद झाला. दोघेही दारूच्या नशेत तर्र असल्याने वादाचे रूपांतर काळावेळेनंतर हाणामारीत झाले. रणजितने त्या ठिकाणी पडलेला बोरिंगचा लाेखंडी पाईप उचलून सतीशच्या कमरेत मारला. यात सतीश गंभीर जखमी झाला होता. यानंतर कुटुंबीयांनी सतीशला उपचारासाठी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तेरा दिवसांनी शनिवारी (दि.३०) सकाळी त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सतीशची आई मीराताई गोमलाडू यांनी घाटी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून रणजित व विठ्ठल गोमलाडू या पितापुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास खुलताबाद ठाण्याचे पोनि. भुजंग हातमोडे हे करीत आहेत.